मालाड दुर्घटनाग्रस्त बेघरांचे त्वरित पुनर्वसन करा
मुंबई नगरी टीम
मुंबई : मालाडच्या कुरार व्हिलेज मधील आंबेडकर नगर आणि पिंपरी पाडा येथील झोपड्यांवर अतिवृष्टीने संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ लोकांचा बळी गेला असून, शंभरहुन अधिक लोक जखमी झाले आहेत अनेकांचे घरसंसार वाहून गेले आहेत.लोक बेघर झाले आहेत.या बेघरांना त्वरित निवारा द्यावा.त्यासाठी महापालिकेने त्यांचे पुनर्वसन करावे अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
रामदास आठवले यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा केली.जमीन वन विभागाची असो की महापालिकेची . ही जमीन भारताची आहे आणि या जमिनीवर झोपड्या बांधून राहणारे हे भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे वनविभाग असो की अन्य कोणतेही शासकीय विभाग त्यांनी या बेघर झोपडीवासीयांबाबत संवेदनशीलता ठेऊन त्यांचा निवारा हक्क त्यांना दिला पाहिजे. अशी भूमिका मांडून या दुर्घटनेत बेघर झालेल्यांना त्वरित घर देऊन पुनर्वसन करण्याची सूचना आठवलेंनी महापालिका अधिकाऱ्यांना केली.
मालाड मधील या दुर्घटनास्थळाला आज आठवलेंनी भेट दिली. येथील याआंबेडकरनगर मधील दुर्घटनाग्रस्तांना कोणत्याही लोकप्रतिनिधीने तीन दिवस झाले तरी भेट दिली नव्हती. तसेच मदत ही मिळाली नव्हती. आंबेडकरनगरच्या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी जाण्यास अरुंद रस्ता असल्याने त्या ठिकाणी कोणतीही गाडी जात नसल्याने आठवले हे रिक्षाने दुर्घटनाग्रस्तांना भेटण्यास आंबेडकरनगरच्या डोंगरावर पोहोचले. दुर्घटनाग्रस्तांच्या अडचणी समजून घेण्यास; त्यांना मदत करण्यास ना.आठवले तेथे पोहोचताच बेघर झालेल्या दुर्घटनाग्रस्तांनी; महिलांनी आशेने आपल्या समस्या सांगण्यास गर्दी केली. यावेळी त्वरित पंचनामा करून दुर्घटनाग्रस्तांना प्रत्येकी ५ हजार खावटी मदत देण्याची सूचना प्रशासनाला आठवलेंनी केली.
मालाड दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे. या दुर्घटनेस अतिवृष्टीने संरक्षक भिंत कोसळली हे कारण असले तरी या ठिकाणी इतकी मोठी भिंत बांधणे योग्य नव्हते. या डोंगरावर मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्याने भिंतीमुळे पाणी अडले जात असल्याने त्या पाण्याच्या लोंढ्याने कितीही मजबूत भिंत बांधली तरी ती कोसळणारच हा धोका भिंत बांधणाऱ्या अभियंत्यांना कळला पाहिजे होता. याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी सूचना आठवलेंनी केली.
मालाड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निरपराधांच्या कुटुंबियांना सांत्वनपर मदत म्हणून महापालिका आणि राज्यशासनाने 5लाख रुपयांची मदत द्यावी.तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षाने या दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठविणार असल्याचे आठवले म्हणाले. मालाड दुर्घटनेतील जखमींची शताब्दी रुग्णालयात जाऊन आठवले यांनी भेट घेऊन आस्थेने त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मालाड दुर्घटनेची माहिती मिळताच आठवले हे संसदेचे सत्र सुरू असताना त्वरित मुंबईत येऊन दुर्घटनास्थळी भेट दिली. तसेच येत्या सोमवारी ८ जुलै रोजी आठवलेंचा रिपाइं तर्फे आयोजित केलेला भव्य सत्कार समारंभ मालाड दुर्घटनेमुळे रद्द करण्याचा संवेदनशील निर्णय संवेदनशिल मनाच्या आठवलेंनी यावेळी जाहीर केला.