डॉ.परिणय फुके गोंदिया भंडा-याचे पालकमंत्री

डॉ.परिणय फुके गोंदिया भंडा-याचे पालकमंत्री

मुबंई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ जिल्ह्यासाठी आज पालकमंत्र्यांची नियुक्ती केली असून,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधार मुनगंटीवार यांच्या जागी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी वित्तमंत्री सुधार मुनगंटीवार यांच्याकडे सोपविण्यात  आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती, पालघर, भंडारा, गोंदिया, हिंगोली, वर्धा,बुलढाणा आणि गडचिरोली या आठ जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त केले आहेत. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची अमरावतीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या जिल्ह्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्याकडे होती.वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी होती.राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे हाताळल्याने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे.

उद्योग, खनिकर्म, वक्फ तसेच अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री अतुल सावे यांची हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळातून डिच्चू दिलेले माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे हे यापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. कामगार मंत्री डॅा. संजय कुटे यांच्याकडे त्यांच्याच म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून वर्ध्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर सुधीर मुनगंटीवार यांची आता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर या जिल्ह्याची जबाबदारी राज्यमंत्री अमरिश राजे आत्राम यांच्याकडे होती.आठ पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले आहे.

Previous articleचैत्यभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही
Next article“त्या”खेकड्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा