पालकमंत्री असावा तर उदय सामंत यांच्या सारखा ! पहाटे ५ वाजता “ऑन फिल्ड”

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग । तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटे ५ वाजता धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.त्यामुळे देवगड मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टीलगतच्या ३८ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.अशा आपत्तीच्या काळात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे रात्रभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिस्थितावर लक्ष ठेवून होते.त्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग येथे अनेक अधिका-यांच्या बैठका घेवून विविध तालुक्यातील स्थिती जाणून घेत जिल्ह्यातील नागरिकांना धीर दिला.

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्जतेच्या आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या.तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर १६ मे रोजी पहाटे ५ वाजता धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे गेली दोन दिवस जिल्ह्यात ठाण मांडून आहेत.संभाव्य संकटाशी सामना करण्यासाठी ते गेली दोन दिवस विविध अधिका-यांच्या बैठका घेवून या आपत्तीचा सामना करण्यासाठी सूचना देत होते.एवढेच नाही तर त्यांनी काल रात्रभर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून परिस्थितीची माहिती जाणून घेतली.पालकमंत्री सामंत हे १६ मे रोजी पहाटे ५ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित राहून तौक्ते वादळाच्या जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.त्यांनी पहाटे ५ वाजता सिंधुदुर्ग येथे आढावा बैठक घेतली.यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्य अधिकारी नायर, एसपी राजेंद्र दाभाडे आणि संबंधित उपस्थित होते.या स्थितीचा कोविड केंद्रांवर कसलाही परिणाम होऊ नये,याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास सामंत यांनी यावेळी दिल्या.

आज दुपारपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी दुपारी रत्नागिरी मध्ये जावून तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.नुकसानी आढावा घेत प्रशासनास आवश्यक त्या सूचना देत रत्नागिरीतील हानीची माहिती जाणून घेत मदतीच्या सूचनाही दिल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पासकमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार या दुहेरी भूमिकेत असणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी आपल्या दोन्ही जिल्ह्यातील तौक्ते चक्रीवादळाच्या संकटात असलेल्या जनतेला त्यांच्या पाठीशी खंभीर उभे राहून धीर देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.आपले कुटुंब संकटात असताना आपल्या कुटुंबियांसोबत राहून धीर देणारा,तौक्ते चक्रीवादळाच्या संकटाशी कुटुंबियांच्या बरोबरीने लढा देणाऱ्या पालकमंत्री सामंत यांच्या ऑन फिल्ड उतरण्याच्या या कृतीचे सिंधुदुर्गवासीयांतून कौतुक होत असून,पालकमंत्री असावा तर उदय सामंत यांच्या सारखा,अशी चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आहे.

Previous articleमहाराष्ट्रातील मृत्यूंच्या आकडेवारीत लपवाछपवी : दरेकरांचा गंभीर आरोप
Next articleमराठा आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा; भाजपाची समिती स्थापन