भरल्या ताटावरून नारायण राणेंना खेचलं आणि केली अटक; बातमीसह पहा व्हिडीओ

मुंबई नगरी टीम

रत्नागिरी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे.राणेंच्या या वक्तव्यानंतर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर त्यांना संगमेश्वरमधील गोळवली येथून ताब्यात घेण्यात आले आहे.राणे यांना अटक केल्यानंतर आता त्यांना महाडच्या पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.त्यापूर्वी राणे यांना अटक करतानाचा व्हिडीओ भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पोस्ट केला आहे.

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान महाड मध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवली असती असे खळबळजनक विधान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले होते.राणे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात विविध ठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटले.काही ठिकाणी सेना आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले तर नाशिकसह राज्याच्या विविध पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरूद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.राणे यांनी जामीन अर्ज स्थानिक न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती.मात्र तिथेही त्यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला.त्यानंतर नाशिक येथे दाखल गुन्ह्यात राणे यांच्यावर कारवाई करण्यात येवून त्यांना संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात आली.संगमेश्वर येथील गोळवली येथे यात्रेदरम्यान भाजप नेत्यांसोबत जेवण करीत असतानाच त्या ठिकाणी कारवाईसाठी पोलीस दाखल झाल्याने भाजप नेत्यांनी पोलीसांशी हुज्जत घातल्याचे आ. प्रसाद लाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.तर राणे यांना अटक करायची असेल तर करा पण त्यांना जेववण करू द्या,भरल्या ताटावरुन राणेंना खेचलं आणि अटक केली असे सांगतानाच,राणे यांच्याजीवाला धोका आहे, असा खळबळजनक आरोप लाड यांनी केला.राणेंवर करण्यात आलेल्या कारवाई नंतर आ.प्रसाद लाड,आ. नितेश राणे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

लाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत राणे यांना पोलीस अटक करण्यास आले असता.आधी मला आदेश दाखवा.नंतरच राणे यांना अटक करा,तुम्ही साहेबांना हात का लावणार ? साहेबांना हात नाही लावायचा.कधीपासून तुमचे हे चालले आहे. कधीपासून गप्प बसायचं ? आधी वॉरंट दाखवा मगच साहेबांना अटक करा, असे असे माजी खासदार निलेश राणे पोलिसांना मोठ्या आवाजात बोलताना स्पष्ट दिसत आहेत.संतप्त निलेश राणे नंतर केंद्रीयमंत्री नारायण राणेही तावातावाने बोलताना यात दिसत आहे.अटक करण्यासाठी आलेल्या पोलीसांकडे कोणत्याही प्रकारचा अटक वॉरंट नव्हते.पोलीस अधीक्षकांकडे आम्ही वॉरंटची मागणी केली.मात्र ते वॉरंट दाखवू शकले नाहीत,राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला आहे.कोणत्याही वॉरंटशिवाय केंद्रीय मंत्र्यावर अशी कारवाई करायला हे काय जंगलराज आहे का ? असा सवाल माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे.दरम्यान संगमेश्वर पोलीस ठाण्यातून राणे यांना पोलीसांनी महाडला रवाना केले असून,त्यांना महाड न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Previous articleमोदी सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा
Next articleमहाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा भाजपाचा कुटील डाव : नाना पटोले यांचा आरोप