दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा: विजय वडेट्टीवार

दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा: विजय वडेट्टीवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : जुलै महिना संपत आला तरी राज्याच्या अनेक भागात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. खरिपाच्या ५० टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. राज्यात आताच दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, पावसाने दडी मारल्याने खरिप हंगाम धोक्यात आला असून केलेली पेरणी वाया गेली आहे. धानाची रोपे करपली असून सोयाबीन पिकही धोक्यात आले आहे. दुबार पेरणीची परिस्थिती असून शेतकऱ्यांच्या हातात दमडीही शिल्लक नाही. कर्जमुक्तीपासून ३० लाख शेतकरी अजून वंचित आहेत. विदर्भात सरासरी ३० टक्केही पाऊस झालेला नाही. जुलै महिन्यात नागपूर शहरात ३ दिवसाआड पाणी कपात सुरु असून जुलै महिन्यातच ही स्थिती असेल तर पुढे पाण्यासाठी तळमळून मरण्याची वेळ येईल.

मराठवाड्यातील धरणांमध्ये उणे २३ टक्के पाणी शिल्लक आहे तर विदर्भातील धरणामध्ये फक्त ६ टक्के पाणी शिल्लक आहे. पीकविमा २५ टक्के लोकांनी सुद्धा काढलेला नाही तर पिककर्जही २५ टक्केच शेतकऱ्यांना मिळालेले आहे. अजूनही लाखो शेतकरी पिककर्जाच्या प्रतिक्षेत आहेत आणि बँका शेतकऱ्यांना नाडवत आहेत. अशी परिस्थिती असताना यात्रा काढून शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा होणार नाही. सरकारने विशेष तातडीने विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळी उपाययोजनांवर चर्चा करावी, असे मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Previous article८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
Next articleखुशखबर : नगरपरिषद नगरपंचायत महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू