जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईची लोकल सुरू होणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई : मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील स्थिती पूर्वपदावर येत आहे. सामान्य मुंबईकर लोकल पुन्हा केव्हा सुरू होणार याकडे डोळे लावून बसला आहे. लवकरात लवकर मुंबईची लोकल रुळावर यावी अशी मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सूरु व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील इच्छा आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सुरू व्हावी, असा प्रयत्न आहे. येत्या दहा दिवसांत त्यावर निर्णय होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यात सामान्य मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असा लोकल संदर्भातील प्रश्न देखील विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देत फार लवकर हा निर्णय होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. नुकताच आम्ही जलक्रीडा, स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हीटी सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोकल सुरू करण्याचा निर्णय लवकरात लवकर होईल. थांबलेल्या मुंबईला पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मला अपेक्षा आहे की, जानेवारीच्या पहिल्या आठव्यात कोणत्याही परिस्थिती लोकल सुरू करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
मार्च महिन्यापासून मुंबईची लोकल सेवा सामान्यांसाठी बंद आहे. त्यात केवळ अत्यावश्यक सेवा बजावणारे आणि महिलांना

प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मुंबई लोकल केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारला जात आहे. १५ डिसेंबरनंतर लोकल सूरु होण्याची चिन्हे होती. मात्र तसे झाले नाही. तर नवीन वर्षात लोकलला पूर्वपदावर आणू, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केला होता. या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार करत नव्या वर्षात लोकल सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जानेवारीत सर्वांसाठी लोकल पुन्हा सुरू झाल्यास मुंबईकरांसाठी हे नव्या वर्षाचे गिफ्टच ठरेल.

Previous articleलोकं दोन्ही बाजूने बोलतात,काही मंडळींचा राजकीय खेळ सुरू !
Next articleसरकार दारूवाल्यांवर मेहरबान का ? हाच तुमचा किमान समान कार्यक्रम