“सेवा आपल्या दारी” उपक्रमातंर्गत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची टीम थेट रिक्षा चालकांपर्यंत
मुंबई नगरी टीम
परळी : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळी शहराबरोबरच ग्रामीण भागात ‘सेवा आपल्या दारी’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून या अंतर्गत आयुष्यान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सर्व सामान्यांची गर्दी होत आहे, नोंदणी करण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची टीम थेट रिक्क्षा चालक, हातगाडी वाले, फळ विक्रेते यांच्या पर्यंत जाऊन सेवा देत आहेत, नागरिकांत या अनोख्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत योजनेकरिता परळी तालुक्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा उपक्रम पंकजा मुंडे व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सध्या सुरु आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळणार आहे. प्रतिष्ठानची टीम शहरातील विविध प्रभागात घरोघरी जाऊन आयुष्यमान भारत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची नोंदणी या अभियानातंर्गत करत आहे. याशिवाय रिक्क्षा चालक, हातगाडी वाले, फळ विक्रेते, पानठेले असा सर्व सामान्य घटकांना याची माहिती व्हावी व त्यांना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने ही टीम काम करत आहे.
या अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळत असून प्रतिष्ठानचे स्वयंसेवक लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी परिश्रम घेत आहेत. नोंदणी करताना एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये याकरिता पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी टीमला सूचना केल्या आहेत. योजनेत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेच्या गोल्डन कार्डचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे.