पोस्टल इन्व्हलपवर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची “छबी”

मुंबई नगरी टीम

बीड । लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण मुंडे यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ३ जून रोजी होत आहे.दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील वंचित,पिडित व उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ३ जून हा त्यांचा पुण्यस्मरण दिन दरवर्षी ‘सामाजिक उत्थान’ दिवस म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जातो, यानिमित्त विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते. यंदा मात्र कोविड महामारीची गंभीर परिस्थिती व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन गोपीनाथ गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम न करण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे.

पोस्टल इन्व्हलपचे लोकार्पण

लोकनेते मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप (लिफाफा) काढले असून त्याचे ऑनलाईन विमोचन ३ जून रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते व केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद,राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत विमोचन होणार आहे. कार्यक्रमाच्या ऑनलाईन लिंकमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर,सुधीर मुनगंटीवार,विनोद तावडे,रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,खासदार डॉ.प्रितम मुंडे,खा. भागवत कराड आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाइन असल्याने त्याची लिंक राज्यातील सर्व नेते,आमदार,खासदार व पदाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे तसेच पंकजा मुंडे यांच्या फेसबुकवरून देखील याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे फेसबुकवरून सर्वांना संबोधित करणार आहेत.

Previous articleकोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत आणि नोकरी
Next articleऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी ४१ तालुक्यात ८२ वसतिगृहे : धनंजय मुंडे