महा पराभवाच्या भीतीने विरोधकांचे “कव्हर फायरिंग”

महा पराभवाच्या भीतीने विरोधकांचे “कव्हर फायरिंग”

मुंबई नगरी टीम

गोंदिया :  आगामी विधानसभा निवडणुका जिंकू शकत नाही, याची खात्री वाटल्याने विरोधकांनी आपल्या महा पराभवाची खरी कारणे सांगण्यापेक्षा ईव्हीएमवर खापर फोडण्याचे “कव्हर फायरिंग” तयार करून ठेवले असल्याची टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी गोंदिया येथे केली.

महाजनादेश यात्रेच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदिया येथे पत्रकारांशी बोलत होते. गेल्या तीन दिवसात महाजनादेश यात्रेने विदर्भातील पाच जिल्ह्यात, २५ विधानसभा मतदारसंघातून ४९१ किलोमीटर प्रवास केला. आज गडचिरोलीकडे रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने “प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर”वर लोकसभा निवडणुका जिंकल्या. त्याचीच पुनरावृत्ती होण्याचे वातावरण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात “अँटी इनकंबन्सी” नाही, असेच स्पष्ट चित्र आहे. पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे अशी जनतेची मानसिकता तयार झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देणारे सरकार महाराष्ट्रात पुन्हा आणायचे अशी लोकांची इच्छा आहे. या परिस्थितीत भांबावलेल्या विरोधी पक्षाला जनतेचे कुठले प्रश्न मांडावे याचे भान उरलेले नाही. विरोधी पक्षांच्या आंदोलनांना जनतेची साथ मिळत नाही. याउलट जनआंदोलनांना सामोरे जाण्याची आणि विविध समाज घटकांचे प्रश्न सोडवण्याची आमच्या सरकारची तयारी आहे, हे जनतेने अनुभवले आहे. राज्यात राज्य सरकार विषयी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. महा पराभवाच्या दिशेने सामोरे जाणाऱ्या विरोधी पक्षांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडायचे हे ठरवून टाकले आहे. ईव्हीएमच्या विरोधात एकजूट होऊन त्यासाठी काढण्यात येणारा मोर्चा हे विरोधकांचे “कव्हर फायरिंग” आहे.विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. कोणीच त्यांची उमेदवारी मागण्यासाठी पुढे येत नाही. अतिशय केविलवाण्या अवस्थेत, आम्ही पक्षातच राहू अशी कार्यकर्त्यांना शपथ देण्याची वेळ विरोधकांवर आलेली आहे, अशीही टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी पाच वर्षात केलेल्या कामांचा तपशीलवार आढावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून मांडला. २०१४ मध्ये आपले सरकार आले तोपर्यंत गोसेखुर्द धरणाची प्रगती केवळ कागदावरच होती. गोसेखुर्द धरणाच्या माध्यमातून गेल्या वर्षी ५० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. यावर्षी एक लक्ष इतर हेक्टर सिंचनाखाली येणार असून आगामी काळात हे प्रमाण दीड लक्ष हेक्टर पर्यंत पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गोंदिया भंडारामध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरू करण्यात आला. भोगवटदार २ मध्ये वर्ग असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना भोगवटदार १ मध्ये परिवर्तित करून त्यांचे सातबारा घरपोच देण्याचे काम या काळात झाले. माजी मालगुजारी तलावांच्या माध्यमातून संरक्षित सिंचन व्हावे म्हणून त्या तलावांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम राज्य सरकारने राबवला व त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. तनसापासून बायो इथेनॉल तयार करण्यासाठी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.धान उत्पादक शेतकऱ्यांना पाच वर्ष सातत्याने धानावर बोनस देण्याचे काम या सरकारने केले. खरेदी प्रक्रिया सुलभ करून गेल्या वर्षी धानाला पाचशे रुपये बोनस देण्यात आला. तसाच बोनस यावर्षी देण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.काँग्रेस आघाडी सरकारच्या तुलनेत बहुतांश कामे दुप्पट प्रमाणात आणि अनेक कामे तिप्पट प्रमाणात झाली असल्याची तौलनिक मांडणी त्यांनी केली.पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गोंदिया येथून गडचिरोलीकडे रवाना झाली. वाटेत जनतेने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

Previous articleराज्याला नैसर्गिक संकटात सोडून मुख्यमंत्री प्रचारात मग्न :  नाना पटोले
Next articleउद्या मुंबईसह पालघर ठाणे रायगड मधिल शाळा व कॅालेजना सुट्टी