मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला
मुंबई नगरी टीम
मुंबई : कोल्हापूर, सांगली, नाशिक भागात उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथकांना तैनात करण्यात आले असून, सर्व प्रकारच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत. जे जे आवश्यक आहे ते सर्व तातडीने करण्याचे स्पष्ट आदेश आपण प्रशासनाला दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात यात्रेच्या सहाव्या दिवसाची सुरुवात यवतमाळ येथून झाली. सात जिल्ह्यातून, ३५ विधानसभा मतदारसंघातून ९९२ किलोमीटरचा प्रवास करून काल रात्री महा जनादेश यात्रा यवतमाळ येथे पोहोचली. आज सकाळी यवतमाळ येथे पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पूर परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतला. लष्कर, नौदल, वायुसेना, प्रशासनातील विविध विभागांशी मुख्यमंत्री सतत संपर्कात आहेत. पुराने वेढलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थिती संदर्भात पत्रकारांना तपशीलवार माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने ४३ फूट ही धोक्याची पातळी ओलांडली असून ५२ फुटापर्यंत पाणी चढलेले आहे. परिणामी कोल्हापूर, शिरोळ, हातकणंगले ही गावे प्रभावित आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी मदत कार्यास वेगाने प्रारंभ केलेला आहे. पाण्याने वेढलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. एअर लिफ्टिंगची आवश्यकता पडली तर वायुसेनेचे हेलीकॉप्टर्स देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. कालपासून या भागात पंधराशे लोकांना सुरक्षितपणे हलवण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे. सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही गंभीर पूर परिस्थिती आहे. राज्याचे मुख्य सचिव सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे स्वतः पूरग्रस्त भागाकडे लक्ष देत आहेत. ते या भागाचा दौराही करणार आहेत. ठिकठिकाणी एनडीआरएफच्या पथकांना आवश्यकतेनुसार रवाना करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडूनही आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी बोलणे झाले असून कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनाही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याविषयीची विनंती आपण केली आहे. यासंदर्भातील आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित खात्यांना देण्यात आल्या असून कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही असे आदेश आपण दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर मधून ३७० कलम आणि ३५ ए हटवण्या संदर्भात अत्यंत धाडसाने निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. देशाच्या इतिहासातील हे एक सोनेरी पान असल्याचे ते म्हणाले.३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरला दिला गेलेला वेगळा दर्जा काढून घेतला गेला आहे. काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, याची पूर्तता खऱ्या अर्थाने कालच्या निर्णयाने झाली आहे. या निर्णयामुळे जम्मू-काश्मिरातील सक्रिय असलेल्या फुटीतरतावाद्यांचा सफाया होणार आहे. यामुळे वर्षानुवर्ष दहशतवादाचा बळी ठरलेल्या काश्मीरमध्ये विकासाचे एक नवे दालन सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.