पुरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्या : विजय वडेट्टीवार

पुरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्या : विजय वडेट्टीवार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  मराठवाडा व विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. या महापुरामुळे शेतमालासह खाजगी संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी तसेच पूरग्रस्त भागात आरोग्य पथके तैनात करावीत, अशा मागण्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यातील पूरस्थितीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहर, परिसर तसेच ठाणे जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, कोकणासह नगर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला आहे. या भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठावरील घरे, वाहने, दुकानातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शहरातील गृहसंकुलातही पाणी शिरून नुकसान झाले आहे. या पुरामुळे खरिप हंगावर पाणी फेरले आहे. कापूस, मका, तूर, तांदूळ, ऊस, भूईमूग, घेवडा, सोयाबीन या शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.  पाण्याचा निचरा न झाल्यामुळे हजारो हेक्टरवरची पीके पिवळी पडू लागली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरिपासाठी कर्ज काढून बी-बियाणं, खताची खरेदी केलेली पण मुसळधार पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

कोयना, कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांना आलेल्या पुरात नदीकाठच्या हजारो घरांना, पिकांना जलसमाधी मिळालेली आहे. पुराचा फटका बसलेल्यांच्या स्थलांतराबरोबर व्यापारी पेठांमधील साहित्यही हलवण्यात आले आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड झाली तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहेत तसेच काही ठिकाणी जिवीतहानीही झालेली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा असल्याने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि पीडितांना विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

पूरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने मोठ्या प्रमाणात आरोग्य पथके तैनात करण्याची आवश्यता आहे. एकीकडे राज्याच्या बहुतांश भागावर नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना सत्तेतील दोन प्रमुख पक्ष भाजप व शिवसेना मात्र प्रचारयात्रा काढण्यात व्यस्त आहेत. राज्यावरचे संकट लक्षात घेता आठ दिवसांपासून महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून आपली सत्ता टिकवण्यात मुख्यमंत्री मग्न आहेत हे असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्र्यांनी ही राजकीय प्रचार यात्रा रद्द करुन मंत्रालयातून परिस्थीतीवर देखरेख करणे तसेच योग्य ती मदत पोहचवण्याला प्राथमिकता द्यावी, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूर परिस्थितीचा  आढावा घेतला
Next articleपुरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत