पुरग्रस्तांच्या स्थलांतरणास सर्वोच्च प्राधान्य
मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : पुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पुरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र व राज्य शासनामार्फत लागणारी सर्व ती मदत युध्दपातळीवर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना केली. जिल्ह्यातील पुरपरिस्थितीचा आणि सुरु असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित केलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
पुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी ६० बोटी उपलब्ध करुन दिल्या असून आणखी जादा बोटी प्राधान्याने दिल्या जातील,असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात उद्भवलेली पुरपरिस्थिती आणि पुरग्रस्तांसाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत केंद्र आणि राज्य शासन सतर्क असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्तीश: पुरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्यावर लक्ष केंद्रीत केले असून पुरग्रस्तांसाठी आवश्यक असणारी सर्व ती मदत करण्यास प्राधान्य दिले आहे. कोल्हापूरातील पुरपरिस्थितीबाबत सातत्यपूर्ण केंद्र शासनाचा राज्य शासनाशी संपर्क असून पुराच्या पाण्याची पातळी कमी होण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आजच चर्चा केली असून त्यांनी अलमट्टीचा विसर्ग आज सायंकाळपर्यंत ५ लाख क्युसेक करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होईल. यापुढील काळातही या दोन्ही राज्यामध्ये आवश्यक तो समन्वय ठेवून पुर परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर अधिक भर दिला जाईल.
पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, गोवा कोस्टलच्या बोटी बरोबरच ओडिसा,पंजाब, गुजरात, गोवा या राज्याबरोबरच देशाच्या इतर भागातूनही जादा टीम मागविल्या आहेत. पुराने वेढा दिलेल्या गावातील पुरग्रस्तांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुरग्रस्तांना संक्रमण शिबीरात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार लसीकरण आणि औषध पुरवठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. घरात पाणी शिरलेल्या पुरग्रस्तांसाठी १० तसेच १५ हजार रुपये, पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी ५ लाख रुपये तसेच पुरग्रस्तांना अन्नधान्याची मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पुरग्रस्तांसाठीच्या बचाव व मदत कार्यासाठी लागणाऱ्या गोष्टी विशेषत: औषधे व अन्य सामुग्री आवश्यकतेनुसार एअर लिफ्ट करण्याची शासनाने तयारी ठेवली असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गॅस, पेट्रोल, डिझेल आदी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याबाबत उच्च पातळीवर चर्चा सुरु असून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. पुरामुळे बंद पडलेल्या जवळपास 390 पाणी पुरवठा योजना पुर ओसरताच प्राधान्याने सुरु करण्याबरोबरच जिल्ह्यातील २ लाखावर शहरी आणि ग्रामीण वीज ग्राहकांची वीज कनेक्शन प्राधान्याने सुरु करण्याबाबत विद्युत वितरण कंपनीने उपाय योजनांसाठी टीम तयार केल्या असून त्यांना आवश्यकतेनुसार आणखी जादा टीम उपलब्ध करुन दिल्या जातील. प्राथमिक अंदाजानुसार पुरामुळे ६७९८४ हेक्टरवरील कृषी पिकांचे नुकसान झाले असून याबाबतही प्रशासनाने तत्काळ उपाय योजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले. एकही पुरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना केली.
पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तु, औषधोपचार उपलब्ध करुन देण्यबरोबरच जनावरांसाठी खाद्य,वैरण उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यकतेनुसार टीम तयार करण्याबरोबरच पुरग्रस्तांसाठी पाणी शुध्दीकरणाची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच शाळांमध्ये स्थलांतरीत करण्यात आलेल्या पुरग्रस्तांना गहू, तांदुळ अशा जीवनावश्यक वस्तू देण्याची खबरदारी घ्यावी.प्रारंभी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील पुरपरिस्थिती आणि सुरु असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. ते म्हणाले,जिल्ह्यात पुरामुळे २३३ गावे बाधित झाली असून १८ गावांना पूर्णपणे पुराचा वेढा पडला आहे. जिल्ह्यात पुरामुळे २०९३३ बाधित कुटुंबे असून ९७१०२ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात पुरग्रस्तांसाठी १५२ संक्रमण शिबीरे असून यामध्ये ३८१४२ लोकांची सोय केली आहे. पुरग्रस्तांच्या बचाव व मदत कार्यासाठी ६० बोटी असून ४२५ जवान कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ३८१३ घरांची पुरामुळे पडझड झाली असून ७९ घरे पूर्णत: पडली असून ३६५१ घरे अंशत: पडली आहेत तर ८३ जनावरांची गोठे पडली आहेत. जिल्ह्यात पुरामुळे १०७ बंधारे पाण्याखाली गेले असून एनएच ४ या राष्ट्रीय महामार्गासह १५८ रस्ते पुरामुळे बंद आहेत. ३९० पाणी पुरवठा योजना बंद पडल्या असून महाविरणचे १३ उपकेंद्रे व १२७ गावठाण व शहरी वाहिन्या बंद पडल्या आहेत. एकूण २०१०३२ वीज ग्राहकांची कनेक्शन बंद असून ६७९८४ हेक्टरवरील कृषी पीकांचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाल्याचे यावेळी सांगितले.