लंडनमधील डॉ. आंबेडकर ‘स्मारकाचा’ दर्जा कायम रहावा: वडेट्टीवार

लंडनमधील डॉ. आंबेडकर ‘स्मारकाचा’ दर्जा कायम रहावा: वडेट्टीवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील स्मारकाचा दर्जा रद्द करण्याचा स्थानिक पालिकेचा निर्णय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने या स्मारकाचा दर्जा कायम रहावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

लंडनमधील आंबेडकर स्मारकासंदर्भात आलेल्या वृत्ताची दखल घेत वडेट्टीवार म्हणाले की, डॉ. आंबेडकर लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असताना ज्या इमारतीत राहत होते ती इमारत भारताने २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने ताब्यात घेऊन तिथे आंतरराष्ट्रीय स्मारक व संग्रहालय बनवलेले आहे. या स्मारकाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. या गर्दीचा त्रास होत असून हे संग्रहालय इतर ठिकाणी हलवावे अशा तक्रारी स्थानिकांनी केल्यामुळे स्थानिक महापालिकेने या चारमजली इमारतीची जागा संग्रहालयासाठी अपुरी असल्याचे सांगत स्मारकाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही वास्तू करोडो लोकांचे आशास्थान आहे तसेच आपल्यासाठी हा आस्थेचा विषय आहे. या प्रश्नी इंग्लंड सरकारशी चर्चा करुन सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा दर्जा कायम रहावा यासाठी प्रयत्न करावेत, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Previous articleसंग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही : रामदास आठवले
Next articleसरकारला सत्तेची एवढी मस्ती कशासाठी : अजित पवार