राज्यातील विधानसभा निवडणुका ईव्हीएमवरच होणार

राज्यातील विधानसभा निवडणुका ईव्हीएमवरच होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात होणारी विधानसभेची निवडणुक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी ही विरोधी पक्षांची मागणी फेटाळून लावत निवडणूक आयोगाने राज्यातल्या विधानसभा निवडणुका या ईव्हीएमवर होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज स्पष्ट केले.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुका या ईव्हीएमवरच होतील हे सांगतानाच या मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते हा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ईव्हीएममध्ये बिघाड होऊ शकतो. पण त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड होणे शक्यच नाही असे सांगत सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे ईव्हीएमवर कोणत्याही प्रकारे संशय घेताच येत नाही. ईव्हीएम परिपूर्ण आहे. त्यामुळे आता मागे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अरोरा म्हणाले.

गेल्या दहा वर्षांत उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत कोणतीच वाढ झालेली नाही. वाढत्या महागाईमुळे निवडणूक खर्चात वाढ व्हावी अशी मागणी काही पक्षांनी केली.तर काही पक्षांनी या खर्चात वाढ होऊ नये अशीही मागणी केली आहे. मात्र खर्चाचा निर्णय घेणे ही मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे सध्यातरी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ करणे शक्य नाही, असेही अरोरा म्हणाले. कोल्हापूर सांगली भागातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यात कसलाच अडथळा येणार नाही. आचारसंहिता काळात ज्या आधीच्या तरतुदी आहेत त्यानुसार हे मदतकार्य सुरूच राहणार आहे. त्याही पलिकडे जाऊन जर निवडणुकीवेळी कागदपत्रांविषयीची अडचण निर्माण झाल्यास तर ती बाब विशेष म्हणून आयोगाकडून निश्चितच सहानुभूतीपूर्वक केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मतदान अधिकाधिक वाढविण्यासाठी १८ ते ३५ वयोगटातील मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीवेळी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, प्रशासन आदी विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांसाठी ५३०० मतदारकेंद्रांमध्ये तळमजल्यावर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात तसेच मतदानाची टक्केवारी जास्तीतजास्त राहवी यासाठी आयोग प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous articleगिरणी कामगारांच्या घरांची सोडत दिवाळीनंतर होण्याची शक्यता!
Next articleभाजपा शरद पवारांना संपवण्याचे काम करतंय