अ‍ॅक्सिस बँक प्रकरणी  मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

अ‍ॅक्सिस बँक प्रकरणी  मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

 मुंबई नगरी टीम

मुंबई : पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग करताना मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रचारसमितीचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना  पटोले म्हणाले की, पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग केल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. स्व. विलासराव देशमुख  मुख्यमंत्री असताना २००५ सालीच पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. असा दावा मुख्यमंत्र्यांनी नुकताच एका मुलाखतीत केला आहे, मात्र त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सांगून स्व. विलासराव देशमुख यांच्या काळात पोलिसांची पगार खाती वर्ग करण्यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या १५ बँकांची नावे होती.

त्या शासनिर्णयात ही खाती एकट्या अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग करावीत असे म्हटले नव्हते. मात्र २०१७ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस मुख्यालयातून एक परिपत्रक काढण्यात आले आणि पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाला. याविरोधात मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती.  या प्रकरणातील गडबड लक्षात आल्याने न्यायालयाने या याचिकेचे जनतहित याचिकेमध्ये रूपांतर करून घेतले आहे. याचाच अर्थ न्यायालयाला याचे गांभीर्य समजले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असे पटोले म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून अ‍ॅक्सिस बँकेला मदत केली म्हणूनच अमृता फडणवीस यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी बढती झाली का? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.

Previous articleनारायण राणेंना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही…..
Next articleपेट्रोलपंपावरील नरेंद्र मोदी यांच्या सरकारी जाहिराती हटविण्याची मागणी