राज ठाकरे ५ ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने चौकशी केल्यानंतर मौन बाळगणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मौन सोडले. मनसेने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र येत्या ५ ऑक्टोबरला आपण पहिली प्रचारसभा घेणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जाहीर केले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील मनसेकडून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील हे त्यांचे पुत्र आहेत. शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीही यावेळी मनसेत प्रवेश केला.कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने चौकशी केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली कोणतीही भूमिका मांडली नव्हती त्यांनी शांत राहणेच पसंत केले होते. राज्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला असतानाही मनसेच्या गोटात शांतता असल्याने ते विधानसभा निवडणुका लढवणार की नाही याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र अखेर राज ठाकरे यांनी आज मौन सोडले. जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या पाच तारखेला आपली पहिली प्रचारसभा घेणार असून इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.