मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा
मुंबई नगरी टीम
मुंबई : तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मला प्रबळ विरोधी पक्ष बनवा अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या सांताक्रुझ येथील पहिल्या जाहीर सभेत केली. राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाने अशी मागणी केलेली आहे.
पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचार सभा रद्द करावी लागल्यानंतर आज सांताक्रुझ येथे होणा-या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ईडी चौकशी नंतर राज ठाकरे काय बोलणार , भाजपावर कोणती टीका करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या गोष्टीवर भाष्य न करता अवघ्या १५ मिनिटात राज ठाकरे यांनी आपले भाषण आटोपते घेतले. निवडणूकीच्या सभामधून सर्वच पक्ष आपल्या पक्षाला सत्ता देण्याचे आवाहन मतदारांना करतात मात्र आज राज ठाकरे यांनी वेगळीच मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मला प्रबळ विरोधी पक्ष व्हायचे आहे अशी मागणी केली. राज्याला सध्या मजबूत आणि सक्षम विरोधी पक्ष आणावा याची गरज आहे. सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष हवा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी राज्यातील खड्डे, शहरांची दुरवस्था या सगळ्याबाबत भाष्य केले. राज्यात एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. जर विरोधी पक्ष सक्षम असेल तर तो जनतेचे प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे मांडू शकतो. माझा आवाका मला ठाऊक आहे त्यामुळे मला सक्षम विरोधी पक्ष बनवा अशी मागणी त्यांनी करतानाच, जेव्हा सत्ता मागायची वेळ येईल तेव्हा मी सत्ताही मागेन असेही राज ठाकरे म्हणाले.