एकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ ?

एकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला असता सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. शिंदे यांची गटनेतेपदी निवड झाल्याने युती सरकार मध्ये शिवसेनेच्या वाट्याला उपमु्ख्यमंत्रीपद आल्यास या पदासाठी एकनाथ शिंदेच प्रबळ दावेदार ठरणार असून, उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडू शकते अशी चर्चा आहे.

शिवसेना भवनात आज पार पडलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत एकमताने एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली. विशेष म्हणजे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला असता सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला.एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व आमदार व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गटनेतेपदासाठी माझे नाव सुचवणे हा माझा बहुमान आहे. विधिमंडळ हे लोकशाहीचे पवित्र मंदिर असून या मंदिराचे पावित्र्य राखून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग शिवसेनेचे आमदार पूर्ण क्षमतेने करतील. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व सहकारी आमदारांनी दाखवलेल्या विश्वासाला पूर्णतः पात्र ठरण्याचा प्रयत्न मी करेन असे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर  शिंदे म्हणाले.

शिवसेनेच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेला वेग आला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार सत्ता स्थापनेसाठी लवकरच शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असून, उपमुख्यमंत्रीपदासह काही अधिकची मंत्रिपदे शिवसेनेला देण्यास भाजप तयार आहे. त्यामुळे लवकरच युतीचे नेते राज्यपालांची भेट घेवून सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील. शिवसेनेच्या वाट्यासा उपमुख्यमंत्रीपद आल्यास या पदासाठी एकनाथ शिंदे हे प्रबळदावेदार असल्याने यापदी त्यांचीच निवड केली जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या विधानसभेत त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

Previous articleखडसेंच्या कन्येचा पराभव करणा-या आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा
Next articleमित्र पक्षांना चार मंत्रीपदे द्या : रामदास आठवले