आमचं ठरलंय ! अजितदादांनी केला हा खुलासा
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात शिवसेना भाजपातील सत्तेचा तिढा कायम असतानाच राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी मोठा खुलासा केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय झाला असून, आम्ही विरोधी पक्षात बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अजितदादांच्या याखुलाश्यामुळे अनेक समिकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने शिवसेना भाजपा महायुतीच्या बाजूने कौल दिला असतनाही मात्र, सत्तावाटपात समान वाटा मिळावा आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेने लावून धरल्याने शिवसेना भाजपातील वाद टोकाला गेला आहे. दुसरीकडे शिवसेनेने भाजपावर दबावतंत्राचा वापर करण्यास सुरूवात करीत थेट स्वबळावर सरकार स्थापनेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस मध्ये दोन गट पडले आहेत. याबाबत राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याबाबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी विरोधी पक्षातच राहणार, असे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील जनतेने तसा कौल आम्हाला दिला असल्यामुळे आमच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. आम्ही विधिमंडळ पक्षनेता निवडलेला असून, पुढील काळात योग्य ती जबाबदारी पार पाडू, असे अजितदादा यांनी सांगितले.