पत्राचाळ प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई नगरी टीम
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज म्हाडाला दिले.यामुळे पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात याविषयी बैठक झाली.पत्राचाळ प्रकल्पासाठी २००८ मध्ये म्हाडा, विकासक आणि रहिवाशी यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता. त्यावेळी शासनावर विश्वास ठेवून ६७२ भाडेकरुंनी आपली घरे रिकामी केली होती.त्यामुळे ४७ एकर जमीन मोकळी झाली होती.तथापि एचडीआयएलने इतर विकासकांना यातील काही भूखंड विकले. मात्र, मुळ रहिवाशांची घरे रखडवली.दरम्यान, भाडेकरुंसाठी बांधावयाचे इमारतीचे अपूर्ण राहिलेले बांधकाम म्हाडाने पूर्ण करून द्यावे व शिल्लक भाडे द्यावे,अशी मागणी घेऊन भाडेकरू गेली दोन तीन वर्षे आंदोलने व पाठपुरावा करीत आहेत. आज अखेर त्याला यश आले आहे. हा भाडेकरूंनी दिलेल्या लढ्याचा मोठा विजय मानला जात आहे.
झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अनेक योजना रखडलेल्या आहेत.काही प्रकल्पांचे बांधकाम बंद आहे. रहिवाशांना घरभाडे मिळत नाही.घरभाड्यात बाजारभावाप्रमाणे वाढ होत नाही.संक्रमण शिबीरे व्यवस्थित नाहीत,तर काही प्रकल्प वीज पुरवठा वा अन्य कारणामुळे रखडले आहेत.अशा सर्व प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करुन रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात गृहनिर्माण विभागाच्या कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत देण्यात येणाऱ्या सदनिकांची संख्या वाढली पाहिजे.झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पात्र झोपडपट्टीधारकांचे परिशिष्ट-दोन तयार करण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करावी व त्यासाठी निश्चित कालमर्यादा आखून द्यावी,तसेच म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडाने येत्या 15 दिवसात किमान दोन प्रस्ताव सादर करावे,असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.धारावीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना लोकांसाठी घरे देण्याबरोबरच वर्षानुवर्षे जे लघु उद्योग सुरु आहेत त्यासाठीही वेगळी जागा द्यावी व या प्रकल्पाबाबत लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.गृहनिर्माण उद्योगाला उभारी देण्याची गरज आहे. पुनर्विकासाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हाडा आहे.झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करताना मूळ मालकालाच घरे मिळाली पाहिजेत.म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लोकसंख्येनुसार प्रसाधनगृहांची संख्याही वाढवावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील ज्या घरात वास्तव्य होते त्या संपूर्ण इमारतीचा विकास म्हाडाने करावा असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले. राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गृहनिर्माण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज यावेळी व्यक्त केली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी रखडलेल्या योजनांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.गोरेगाव सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे व रहिवाशांचे थकलेले भाडे द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.