विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे संजय दौंड तर भाजपचे राजन तेली रिंगणात
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या २४ जानेवारीला पोटनिवडणुक होत असून,राष्ट्रवादीच्यावतीने संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.दौंड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भाजपकडून राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या २४ जानेवारी रोजी पोटनिवडणुक होत असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून संजय दौंड यांनी तर भाजपकडून राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे,काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड काँग्रेसचे आमदार भाई जगताप, राजेश्वर आबा चव्हाण, राजेसाहेब देशमुख, गोविंद देशमुख, आदित्य पाटील यांसह आदि उपस्थित होते.
भाजपकडून राजन तेली यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला आहे.यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर,आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपचे नेते विनोद तावडे उपस्थित होते.धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयानंतर त्यांच्या विधानपरिषदेत रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व धनंजय मुंडे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दानुसार संजय दौंड यांना दिली आहे.संजय दौंड हे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत.त्यामुळे माजी मंत्री दौंड यांच्या कुटुंबात यानिमित्ताने तब्बल ३० वर्षां नंतर आमदारकी मिळण्याची शक्यता निर्णाण झाली आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दौंड पिता पुत्रांनी धनंजय मुंडे यांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच त्याचवेळी मुंडेंनी शरद पवारांच्या करवी दौंड परिवाराला विधानपरिषदेचा शब्द दिला होता,असे बोलले जाते व यानिमित्ताने तो दिलेला शब्द पवारांनी पाळला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.महाराष्ट्र विकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता संजय दौंड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
परळीच्या राजकारणात मागील ३५ वर्षांपासून मुंडे आणि दौंड कुटुंबातील राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे.आज ज्या संजय दौंड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे त्या संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड यांनी १९८५ मध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव केला होता. ते काही दिवस राज्यमंत्रीही होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा कधीही निवडून आले नाहीत. ९०,९९ साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.धनंजय मुंडे यांनी संजय दौंड यांचा २ वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव करून विजय मिळवला तर एक वेळा संजय दौंड यांनी पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांचा पराभव केला.आज त्याच संजय दौंड यांना उमेदवारी मिळावी म्हणून धनंजय मुंडे यांनी प्रयन्त केले.आज या निमित्ताने या दोन नेत्यांमध्ये असलेले शत्रुत्व ते मैत्री असे वर्तुळ पूर्ण झाले आहे.
भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार राजन तेली या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला. राजन तेली यांचे पक्षाच्या पलीकडे विविध पक्षात मित्रत्वाचे संबंध आहेत,त्याचाही उपयोग या ठिकाणी निश्चितपणे येईल. तसेच राजकारणातील राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात, त्यामुळे ते या निवडणुकीत नक्कीच विजयी होतील असेही दरेकर यांनी सांगितले. राजन तेली यांनी विधानपरिषदेच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यांचा राजकीय अनुभवही दांडगा आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षामधील एक लढाऊ नेता या निवडणूकीमध्ये आम्ही उतरविला आहे असेही दरेकर यांनी सांगितले.१७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
विधानसभेतील पक्ष बलाबल पुढील प्रमाणे- शिवसेना ५६,राष्ट्रवादी ५४,कॅाग्रेस ४४,भाजप १०५, बहुजन विकास आघाडी ३,समाजवादी पक्ष २, एमआयएम २, प्रहार जनशक्ती पक्ष २,मनसे १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( मा), शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १,राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य १, क्रांतीकारी शेतकरी पक्ष १, अपक्ष १३