मंत्री अशोक चव्हाण यांचा शिवसेनेला गंभीर इशारा

मंत्री अशोक चव्हाण यांचा शिवसेनेला गंभीर इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.इंदिरा गांधी यांच्या बद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य असून,कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल,पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही.असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. तर संजय राऊत यांनी भविष्यात विचारपूर्वक विधाने करावीत असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तप्त झाले आहे.त्याच्या या विधानावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.खा. संजय राऊत यांनी चुकीची विधाने केली आहेत. स्व. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वश्रृत आहे.त्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे.त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल,पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच,महापुरूषांबद्दल,देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी माझी अपेक्षा मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान खा. संजय राऊतांनी मागे घेतले आहे त्यामुळे वादावर पडला आहे,पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत.आमच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे लक्षात ठेवावे असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.स्व. इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या.१९७५ सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले.मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले.ज्या करीम लाला बद्दल बोलले जातेय त्याच्यासकट हाजी मस्तान युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत.आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी.छत्रपती शिवरायांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये अशी टीका थोरात यांनी केली.

Previous articleप्रशासनात मोठे फेरबदल; तब्बल २२ सनदी अधिका-यांच्या बदल्या
Next articleसंजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले : खा नारायण राणे