संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले : खा नारायण राणे

संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले : खा नारायण राणे

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत असताना आता यामध्ये भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील उडी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची जोरदार टीका नारायण राणे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जे बोलायचे आहे, ते संजय राऊत यांच्या तोंडून बोलत आहेत असा दावा करतानाच तसे नसते तर त्यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य केले असते.छत्रपतींच्या वशंजावर बोलल्यानिमित्त राऊत यांना माफी मागायला लावली असती असे देखील राणे यावेळी म्हणाले.

भाजप प्रदेश कार्यालयात खा. नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खा.संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला. भावाला मंत्रीपद न मिळाल्याने आता राऊत असे संतूलन बिघडल्यासारखे वागत असून,त्यांना लवकरच सरकारी रुग्णालयात दाखल करायला हवे अशी टीका राणेंनी यावेळी केली.यावेळी बोलताना राणे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत,त्यांच्याबद्दल जर काय बोलाल तर जीभ जागेवर राहणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. एवढेच नाही तर संजय राऊतांना सत्तेचा माज आला आहे. शिवसेनेने स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केली आहे. शिवसेनेला हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका देखील राणेंनी यावेळी केली. तसेच यापुढे महाराजांबद्दल आणि त्यांच्या वशंजाबद्दल असे बोलण्याचे धाडस करु नये,असेही राणे यावेळी म्हणाले

उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे,मागणारे ते कोण असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. तसेच मला तर संशय येतो की, उद्धव ठाकरेंना जे बोलायचे आहे,ते संजय राऊत यांच्या तोंडून बोलत आहेत.कारण तसे नसते तर त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य केले असते.छत्रपतींच्या वशंजावर बोलल्यानिमित्त राऊत यांना माफी मागायला लावली असती असे देखील राणे यावेळी म्हणाले. एवढेच नाही तर विकासकामाबद्दल बोला, तुम्ही महाराजांच्या वंशजाबद्दल बोलाल तर याद राखा असा इशाराच राणेंनी यावेळी दिला. तसेच भाजप आणि मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी शांत बसणार नाही. राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने काम करावे, मात्र वशंजावर बोलू नये. विशेष बाब म्हणजे संजय राऊत यांनी दाऊद बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल देखील राणेंनी खरपूस समाचार घेतला. मी दाऊदशी बोलायचो, त्याला दमही दिला, असेही राऊत यांनी म्हणाले त्यामुळे राऊत दाऊदशी काय बोलायचे? दाऊदला दम दिल्यानंतर त्याने काहीच कसे केले नाही? याची गृहविभागाने चौकशी केली पाहीजे असे देखील राणे यावेळी म्हणालेत. यावेळी इंदिरा गांधी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना राणे यांनी काँग्रेस नेत्यांवर देखील टीका केली. सध्या सत्ता आणि खुर्चीसाठी काँग्रेसचे नेते फक्त ट्विटरवर बोलतात प्रत्यक्षात कुणी पुढे येत नाही. तसेच आता राऊत यांनी केलेले वक्तव्य मागे घेतल्याचे म्हटले पण त्यांचे वक्तव्य रेकॉर्डवरुन जाणार नाही. परंतु इंदिरा गांधींनी करीम लालाची भेट घेतल्याचे वक्तव्य केल्यानंतरही काँग्रेसवाले शांत बसलेले आहेत. त्यांना याबद्दल काही वाटच नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

Previous articleमंत्री अशोक चव्हाण यांचा शिवसेनेला गंभीर इशारा
Next articleनवी मुंबईतील भूमिपुत्रांना दिलासा देणारे पुनर्विकास धोरण तयार करा :एकनाथ शिंदे