नागपूरातील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

नागपूरातील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

मुंबई नगरी टीम

नागपूर : गेल्या सोमवारपासून नागपूरात सुरू झालेले राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे आज शनिवारी सूप वाजले.पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २४ फेब्रुवारी २०२० पासून मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी तर विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांनी केली.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन गेल्या सोमवारपासून नागपुरात सुरु झाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अघिवेशन होते.तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही हे विरोधी पक्षनेते म्हणून पहिलेच अधिवेशन होते.विधिमंडळ कामकाजाचा कसलाही अनुभव नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या तडाखेबंद भाषणाने आणि फटकेबाजीने हे अधिेवेशन चांगलेच गाजवले.आपले पहिलेच अधिवेशन असले तरी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक शैलीचा आपल्या संयमी शैलीत समाचार घेतला.आठवडाभर चाललेल्या या अधिवेशनात विधानसभा सभागृहाच्या एकूण सहा बैठक झाल्या.या सहा बैठकांमध्ये प्रत्यक्षात ४७ तास २९ मिनिटे कामकाज झाले. मंत्र्यांची अनुपस्थिती तसेच अन्य कारणांमुळे दोन तास ५५ मिनिटे  वाया गेले. तर दररोज सरासरी ८ तासाचे कामकाज झाले .या अधिवेशनात १०५७ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या त्यापैकी ७१ लक्षवेधी सूचना स्वीकृत झाल्या असल्या तरी एकही लक्षवेधीवर प्रत्यक्षात चर्चा झाली नाही. विधानसभेत एकूण २६पैकी १७ अर्धा तास सूचना स्वीकृत झाल्या असल्या तरी एकही सूचनेवर चर्चा होऊ शकली नाही. या अधिवेशनाचे विशेष म्हणजे १९९५ १९९२,१९९७ व २००२ च्या अधिवेशनाप्रमाणे या अधिवेशनातदेखील  प्रश्नोत्तराचा तास झाला नाही.

Previous articleमागासवर्गीय विभागाच्या खर्चासाठी कर्नाटक आंध्रप्रदेशाच्या धर्तीवर कायदा
Next articleशेतक-यांना दिलासा :  शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ