शेतकरी कर्जमाफीच्या नावाला कलंक लागू दिला जाणार नाही: छगन भुजबळ

शेतकरी कर्जमाफीच्या नावाला कलंक लागू दिला जाणार नाही: छगन भुजबळ

मुंबई नगरी टीम

नायगाव : शेतकऱ्यांच्या हितासाठी महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढले. नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा दिला. त्यांच्या गौरव व्हावा त्यांच्या विचारांची जोपासना यासाठी कर्जमाफीला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव दिले आहे. त्यामुळे त्यांचा नावाला कलंक लागू दिला जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.नायगाव जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री राम शिंदे, आ.मकरंद पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, कमल ढोले पाटील,बापू भुजबळ, प्रा.हरी नरके,जि प अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी श्वेता सिंगल,महिला प्रदेशअध्यक्ष मंजिरी धाडगे, दत्ता बाळसराफ, ऍड.सुभाष राऊत, प्रितेश गवळी, जिप उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे,सरपंच सुधीर नेवसे, उपसरपंच सीमा कांबळे, सोनी टीव्हीचे नितीन वैद्य, अजय भाळणवकर, सावित्रीजोती मालिकेचे कलाकार अमोकर गोवर्धन, अश्विनी कासार, वंदना धायगुडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन बरगुडे पाटील, डॉ.राजू वाघमारे यांच्यासह समता सैनिक पदाधिकारी व राज्यभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमाफी दिली आहे. त्यांचा राज्यातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसेच दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील मदत करण्यासाठी शासन नवीन योजना आखण्यात येईल. या योजनेला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव दिले आहे त्या नावाला कलंक लागू दिला जाणार नाही अशी ग्वाही सरकारच्यावतीने देतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, आपल्या देवतांच्या पायावर डोकं ठेऊन आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. पुण्यातील फुले वाडा आणि नायगाव येथील स्मारक ही आपल्यासाठी उर्जाकेंद्र असल्याने त्यांनी यावेळी सांगितले.विधानपरिषदेचा सदस्य असतांना संपूर्ण निधी नायगावसाठी दिला.तसेच महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पुतळ्याची स्थापना केली.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले. यापुढील काळातील येथील राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.

भुजबळ की, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमासाठी शासनाकडून १० लक्ष रुपये तात्काळ मंजूर केले हा निधी कायमस्वरूपी मिळावा यासाठी तरतूद करण्यात येईल. मात्र याठिकाणी असलेला हा सोहळा अधिक दिमाखदार व्हायला हवा. तसेच या कार्यक्रमातून महिलांचा सन्मान झाला पाहिजे त्यांना किमान १ लक्ष रुपयांचा पुरस्कार यातून दिला जावा अशी सूचना त्यांनी केल्या.नागरिकत्व कायद्याबाबत आपल्या भाषणात ते म्हणाले की,देशात सद्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे विद्यापीठातुन उद्रेक निर्माण झाला आहे. हा उद्रेक थांबला पाहिजे असे त्यांनी सांगितले. फुले दाम्पत्यानी देशात सव्वाशे वर्षापूर्वी समाजाला संघटित करून त्या समाजा समाजातील तंटे सोडविण्याचे काम केले. त्यांनी दिलेले समतेचे विचार आत्ताच्या परिस्थितीवर मात करू शकता असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सोनी टीव्हीच्या माध्यमातून मालिका काढण्यात येत असल्याने उपस्थित सर्व टीमचे त्यांनी कौतुक केले.अंधश्रद्धेचा पगडा आजही समाजावर आहे.त्यामुळे फुले दाम्पत्यांच्या विचारांचे धन आपल्याला पेरायचे आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous articleसत्तेसाठी किती वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन कराल ? : फडणवीस 
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या रिंगणात !