सत्तेसाठी किती वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन कराल ? : फडणवीस 

सत्तेसाठी किती वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन कराल ? : फडणवीस 

मुंबई नगरी टीम

नंदूरबार : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी अनन्वित अत्याचार सहन केले. दोनवेळा जन्मठेप भोगणारे ते एकमेव स्वातंत्र्यसेनानी. ज्या कुटुंबाने राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचा अपमान शिवसेना कितीवेळा सहन करणार, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी नंदूरबार जिल्ह्यांमधील सभांमध्ये बोलताना उपस्थित केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी अवमानजनक उदगार काढल्यानंतर शिवसेना गप्प होती. काल काँग्रेस पक्षाने एक पुस्तक वितरित केले. ज्या वीर सावरकरांनी देशासाठी संपूर्ण जीवन दिले, त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या दर्जाचे लिखाण त्यात करण्यात आले आहे. ते समलैंगिक होते, असे हे विकृत लिखाण आहे. यावर आम्ही गप्प बसणार नाही. इतक्या खालच्या दर्जाचे लिखाण करीत असाल, तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ. वीर सावरकरांचा हा अपमान आम्ही अजीबात सहन करणार नाही. वीर सावरकर हे या देशाचे आराध्य आहेत. शिवसेना सत्तेसाठी मूग गिळून बसली असली तरी आता त्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल. अशांचा नायनाट आता भारताची जनता केल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

धुळे जिल्ह्यात रवाना होण्यापूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आज धडगाव आणि बोरद येथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी दोन सभांना त्यांनी संबोधित केले. गरिब आणि आदिवासींसाठी गेल्या ५ वर्षांच्या काळात सरकारच्या वतीने केलेल्या कामांची माहिती यावेळी त्यांनी दिली. ते म्हणाले की, विश्वासघाताने तयार झालेल्या या सरकारने पहिला विश्वासघात अवकाळी पावसाने त्रस्त शेतकर्‍यांचा केला. त्यांना मदत दिली नाही. दुसरा विश्वासघात कर्जमाफीतून त्यांना वगळून केला आणि आता १० रूपयांत भोजन देण्याचे सांगून त्यालाही अटी लावल्या. सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन तर हवेतच विरले. आता १० रूपयांत किती लोकांना भोजन याचे जिल्हाश: आकडेच दिले जात आहेत. संपूर्ण नंदूरबार जिल्हा मिळून केवळ ३०० लोकांना हे जेवण मिळू शकेल. महाराष्ट्राला मुर्ख बनविण्याचा हा नवा उद्योग आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Previous articleदेवेंद्र फडणवीस यांचा गारपीट आणि पावसात प्रचार
Next articleशेतकरी कर्जमाफीच्या नावाला कलंक लागू दिला जाणार नाही: छगन भुजबळ