एक वडापाव खावून लोकांच्या कामासाठी मंत्रालयात फिरायचो: धनंजय मुंडे
मुंबई नगरी टीम
मुंबई : केवळ एक वडापाव खावून लोकांची कामे करण्यासाठी दिवसभर मंत्रालयात फिरायचो,त्यावेळी याच मंत्रालयात मंत्री म्हणून येण्याचा योग येईल असे त्यावेळी वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे नूतन मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयातील आपल्या सहाव्या मजल्यावरील दालनात पदभार स्वीकारला.पदभार स्वीकारण्यापूर्वी आज त्यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास विनम्र अभिवादन केले.तसेच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास भेट देत त्यांचा आशीर्वाद घेतला.माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे जयंतीदिनी दर्शन घेत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.मंत्रालयात प्रवेश करताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन केले.मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आपले गा-हाणे मांडण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी झाल्याने सहावा मजला फुलून गेला होता.त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.पूर्वी लोकांच्या कामासाठी आपण मंत्रालयात यायचो तेव्हा एक वडापाव खाऊन दिवस दिवस काढायचो आणि मंत्रालयातील लोकांच्या कामांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचो, त्यावेळी याच मंत्रालयात कधी आपण मंत्री होऊन येऊ असे वाटले नव्हते, अशा शब्दात आपल्या जुन्या आठवणी मुंडेंनी व्यक्त केल्या.
शरद पवार यांनी मला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या अतिमहत्त्वाच्या विभागाची जबाबदारी दिली त्याबाबत मी साहेबांचे आभार व्यक्त करतो. समाजातील वंचित घटकांना न्याय देणारा हा विभाग आहे. आतापर्यंत या विभागाने समाजातील वंचित आणि गोरगरिबांसाठी चांगले काम केले आहे. यापुढेही हा विभाग अतिशय गतीमान पद्धतीने काम करणार. ज्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती जबाबदारी मी चोख पद्धतीने पार पाडण्यासाठी सदैव तत्पर राहीन अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री मुंडे यांनी व्यक्त केली.
यावेळी मुंडेंनी पदभार स्वीकारताच मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी तसेच आपले प्रश्न व समस्या घेऊन आलेल्या अनेकांनी सहाव्या मजल्यावरील दालनात गर्दी केली होती.मुंडेंनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांमार्फत सामाजिक न्याय विभागाचा सविस्तर आढावा घेतला. तब्बल पाच तास ही आढावा बैठक चालली.त्यांनी यावेळी शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, तसेच इंदूमिल येथील स्मारक २०२२ पर्यंत पूर्ण करू असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी आज धनंजय मुंडे यांची भेट घेऊन फकिरा हे पुस्तक भेट दिले.