फडणवीसांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन तर पवारांवर साधला निशाणा !

मुंबई नगरी टीम
मुंबई : एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याच्या निर्णयाचे स्वागत करतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची कायद्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याच्या निर्णयाचे देखील स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.भीमा कोरेगाव आणि एल्गार हे वेगळे नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसची सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची कायद्याबाबत भूमिका अजून स्पष्ट नाही.पण त्यांनी जर काही अटी शर्तींसह या कायद्याला समर्थन दिले तर त्यांचे स्वागतच आहे असेही स्पष्ट केले.

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण एकच आहे हे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यातून बुद्धी भेद करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही फढणवीस म्हणाले.भीमा कोरेगाव दंगलींच्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी यामध्ये हिंदुत्ववाद्यांचा हात असल्याबाबत आरोप केले होते.आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामधून त्यांच्या या विधानाला छेद मिळत आहे.त्यामुळे ते अशी विधान करून बुद्धिभेद करून दलित समाजामध्ये गोंधळ निर्माण करू पाहता आहेत.राम मंदिरासाठी न्यास तयार करावा,हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मुस्लिम समाजाचे सर्व स्थळ हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, हेही शरद पवारांना ठावूक आहे. तेथे न्यास नसतो. सध्या मुस्लिम मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे.अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला.

Previous articleराज्यात पुन्हा महाविद्यालयीन निवडणुका व्हाव्यात : शरद पवार
Next articleअर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजणार