मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभेत आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी सावरकर यांच्या गौरवपर प्रस्ताव सभागृहाने संमत करावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावास अध्यक्ष नाना पटोले यांनी अनुमती नाकारताच मी सावरकर अशा भगव्या टोप्या घातलेले भाजप सदस्यांनी घोषणाबाजी केली तर काही सदस्यांनी सरकारच्या धिक्काराचा फलक फडकविला.भाजप सदस्यांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत घोषणाबाजी करीत ठाण मांडले.या गदारोळातच लक्षवेधीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिले.पाच विधेयकेही संमत झाली.त्यांनंतर अध्यक्ष पटोले यांनी सभागृहाचे कामकाज दिवससभरासाठी तहकूब केले.
विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा गौरव प्रस्ताव संमत करावा आणि काँग्रेस पक्षाचे मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकात स्वा. सावरकर यांच्या बदनामी केल्याने त्या मासिकावर बंदी घालण्याची मागणी केली.अध्यक्षांनी गदारोळातच लक्षवेधी पुकारल्या.महिला अत्याचारासंबधातील लक्षवेधी व विधेयके मांडली या वेळात फडणवीस वगळता सर्व भाजप सदस्य अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत घोषणा देत होते. त्यानंतर मोकळ्या जागेत या सदस्यांनी ठाण मांडले.या गदारोळातच लक्षवेधीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिले.अध्यक्षांनी फडणवीस यांची सूचना अस्वीकृत करताच संतप्त भाजप सदस्यांनी प्रचंड गदारोळ सुरू केला.स्वा.सावरकर यांची बदनामी करणा-या सरकारचा धिक्कार असो,अशा घोषणेचा फलक फडकवीत हे सदस्य अध्यक्षांपुढे आले.सावरकर सावरकर, देशभक्त सावरकर अशा घोषणांनी सभागृह दणाणून जात होते. त्यातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्षवेधीला गदारोळातच उत्तर देताना आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात या अधिवेशनात महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात येईल अशी घोषणा केली.
अध्यक्ष पटोले यांनी राज्यपाल अभिभाषणावर चर्चा आहे याचे स्मरण देत इतर लक्षवेधी पुढे ढकलल्या. शासकीय विधेयके संमत होत असताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आक्षेप घेतला. लोकशाहीचा मुडदा पाडू नका,सावरकरांच्या गौरवपर प्रस्ताव संमत झालाच पाहिजे, शिदोरी मासिकावर बंदी घाला, त्यामध्ये लिहिलेले शिवसेनेला मान्य आहे का असेही ते जोरजोरात विचारत होते. त्यावेळी भाजप सदस्यांची दादागिरी नही चलेगी या घोषणा सुरूच होत्या. अखेर गदारोळामुळे अध्य़क्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब होत असल्याचे जाहीर केले .