स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरुन सरकारकडून राजकारण

मुंबई नगरी टीम
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव महाविकास सरकराने मांडू दिला नाही, सावरकर यांच्या गौरव प्रस्तावावरुन सुध्दा सरकार राजकारण करीत आहे. विधानपरिषदेत आमचा प्रस्ताव न मांडू देता सभागृहाचे कामकाज गुंडाळण्यात आले,त्यामुळे आम्ही सभागृहात प्रति सभागृह भरवून सावरकर यांचा गौरव प्रस्तावाचा ठराव संमत केला व सरकारच्या सावरकर विरोधी कृतीचा निषेध केला अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.

दरेकर यांनी सांगितले की,अधिवेशन काळात सरकारचा मुस्कटदाबीचा अनुभव विरोधी पक्षाला आला आहे. प्रखर देश भक्तीचा हुंकार असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी कॉंग्रेसच्या शिदोरी या मुखपक्षात अवमानकारक, घृणास्पद व चुकीचे लिखाण येत असताना महाविकास आघाडी सरकारची भूमिका काय आहे हे गौरव प्रस्ताव आणून देशाच्या जनतेला दाखवून देण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न होता. त्यामुळे विधान परिषदेच्या नियम २३ अन्वये गौरव प्रस्ताव घेण्याची विनंती सभापती रामरामजे निंबाळकर यांच्याकडे केली होती. मात्र, सभापतींनी आम्हाला मराठी संदर्भात विधेयक पारित झाल्यानंतर या प्रस्तावा संदर्भात भूमिका मांडायला परवानगी देतो असे सांगितले होते. त्यामुळे मराठीचे विधेयक असल्याने आम्ही सर्वानी मराठी भाषेला, मराठी भाषा राज्याील सर्व शाळांमध्ये करण्याच्या विधेयकाला पाठिंबा दिला असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे,त्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव आम्हाला मांडायचा आहे अशी विनंती सभापतींनी केल्याचे सांगून दरेकर म्हणाले की, शिदोरी मासिकात सावरकर यांच्या बद्दल जे प्रसिध्द झाले आहे, त्यावर सरकारची काय भूमिका आहे याचा खुलासा आम्हाला हवा आहे. कॉंग्रेसच्या शिदोरी या मासिकात सावरकर यांच्या विरोधात छापून आले आहे. कॉंग्रेस हा महाविकास आघाडीचा एक भाग आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे हे आम्हाला विचारायचे होते.पण सरकारने विरोधकांची पुन्हा एकदा दडपशाही, मुस्कटदाबी केली. सभागृहात आम्ही प्रति विधानपरिषद बसविली.सरकारने आम्हाला प्रस्ताव मांडू दिला नाही त्यामुळे सभागृहात प्रति विधान परिषद सदस्य म्हणून भाई गिरकर, प्रसाद लाड,महादेव जानकर यांनी भूमिका मांडून आम्हाला समर्थन दिले. सभागृहात जर आमची मुस्कटदाबी केल्यामुळे प्रति सभागृहाची प्रतिकृती करून आम्ही तो सावरकर यांचा गौरव ठराव संमत केला. हा गौरव ठराव त्यांच्या कुटुबियांना व सावरकर यांच्याशी संबिधत संस्थांना पाठविण्यात येणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

Previous articleबलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा
Next articleमहाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची