महाविकास आघाडी सरकारनेही एनपीआर,एनआरसीविरोधात ठराव करावा: नसीम खान

मुंबई नगरी टीम
मुंबई : बिहारमध्ये संयुक्त जनता दल-भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारने एनपीआर व एनआरसीविरोधात ठराव मंजूर केला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट करुन लवकरात लवकर तसा ठराव अधिवेशनात संमत करुन घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते नसीम खान यांनी केली आहे.

नसीम खान यांनी यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नसीम खान म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी सरकारने एनपीआर व एनआरसीवरची भूमिका स्पष्ट करावी आणि सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात या दोन्हीला विरोध करणारा ठराव संमत करुन घ्यावा. बिहार राज्य सरकारने एनपीआरला विरोध करताना जनगणना सुद्धा २०१० च्या सुत्रानुसारच घ्यावी असा ठराव केला आहे तसा महाराष्ट्रातही करावा, असेही नसीम यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात सकारात्मक असून दोन तीन दिवसात चर्चा करुन निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचेही नसीम खान यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार सीएए, एसपीआर व एनआरसीवरून जनतेची दिशाभूल करत आहे. काँग्रेस व काँग्रेसच्या मित्र पक्षांची सरकारे ज्या राज्यात आहेत तेथे एनआरसी, एनपीआर लागू न करण्याची भूमिका तिथल्या सरकारांनी घेऊन तसे ठरावही केले आहेत. महाविकास आघाडी सरकारही असाच निर्णय घेईल असा विश्वास नसीम खान यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous article“इये मराठीचिये नगरी” कार्यक्रमातून विधानमंडळात “मराठीचा गजर”
Next articleमंत्र्यांच्या निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे देण्याची मंत्री उदय सामंत यांची मागणी