तर तु्म्हाला वडे तळायला बसवलंय का ? देवेंद्र फडणवीसांचा सरकारला सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर भाजपचे नेते आज अधिवेशनाच्या दुस-या दिवशी आक्रमक झाले होते.भाजपच्या सदस्य आज कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पाय-यावंर अभिरुप सभागृहाचे कामकाज करीत सरकारचा निषेध केला.यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवणा-या सरकारवर हल्लाबोल केला.जर सर्व केंद्र सरकार करणार असेल तर तु्म्हाला वडे तळायला बसवलंय का ? असा घणाघात त्यांनी सरकारवर केला.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळे भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. आजच्या कामकाजाच्या दुस-या दिवशी या मुद्द्यावर आक्रमक होत भाजपच्या सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा सुरू केली.यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांना मदत केंद्राने करावी,कर्जमाफी,चक्रीवादळात मदत,पीक विमा,राज्याचे अर्थकारण,मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,पदोन्नतील आरक्षण केंद्राने द्यावे,मेट्रोचे काम थांबले केंद्र सरकारने करावे,लसीकरण केंद्र सरकार करणार, जर सर्व केंद्र सरकार करत असेल तर तु्म्हाला वडे तळायला बसवलंय का ? असा सवाल फडणवीस यांनी यावेळी केला.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा सुरू असतानाच नियमांवर बोट ठेवत विधानमंडळाच्या मार्शल यांनी भाजपचे हे अभिरुप सभागृह बंद केले.त्यामुळे भाजपचे सदस्य अधिकच आक्रमक झाले.सरकारने मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचे भांडण नाही.ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही.सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार.माध्यमांवर मार्शलकरवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला.या सरकारला आमचा डीएनए माहीत नाही.इंदिरा गांधींनीही आणीबाणी लादून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता.पण त्याही आमचा आवाज दाबू शकल्या नाहीत, असे सांगतानाच आम्हाला विधानसभेच्या पायरीवर बसू दिले जात नसेल तर आम्ही पत्रकार कक्षात रुममध्ये प्रतिविधानसभा भरवू असा इशारा त्यांनी फडणवीस यांनी दिला.

Previous articleMPSC च्या विविध संवर्गातील एकूण १५ हजार ५११ पदे भरण्यास मान्यता
Next articleउत्कृष्ट भाषण पुरस्कार विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना प्रदान