मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी रूपयांचा निधी लवकरच वितरित करण्यात येणार असून,राज्यातील प्राध्यापकांची २ हजार ९०० रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही सुद्धा शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले,२०१० पासून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये स्थापन झालेल्या अध्यासनांचा आढावा घेऊन ती सुरळीत चालण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे.त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी रूपये देण्यात येतील. त्या निधीचा विनियोग विद्यार्थीहित लक्षात घेऊन कशा प्रकारे करणार, त्याचे नियोजन करून प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.शासन आणि विद्यापीठे वेगळी नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून सामंत म्हणाले, शासन आपल्या स्तरावरून विद्यापीठांची काळजी वाहात असताना विद्यापीठांनीही आपले उत्तरदायित्व योग्य प्रकारे सांभाळणे आवश्यक आहे. यापुढील काळात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन विद्यापीठे व संस्थाचालक यांच्या विविध प्रस्तावांवर समोरासमोर चर्चा करून ते मार्गी लावण्याचे धोरण अवलंबण्यात येईल, जेणे करून त्यांचा मंत्रालयात खेटे घालण्याचा त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात येईल.राज्यातील प्राध्यापकांची २ हजार ९०० रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्याची माहिती राज्याचे सामंत यांनी दिली.
सामंत म्हणाले, महाराष्ट्र – कर्नाटकच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या हद्दीत मराठी महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असून सध्या तो विचार प्राथमिक अवस्थेत आहे. हा विचार पूर्णत: अराजकीय स्वरूपाचा असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा न पोहोचविता सीमाभागातील मराठी भाषेच्या शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी शिक्षण देण्यासाठी हे महाविद्यालय असावे, असा हेतू आहे. त्या दृष्टीने योग्य स्थळाची निवड करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केली.
विद्यापीठामधील विविध प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पाच वर्षांच्या कालावधीत साधारणत: दहा कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करता येईल का, या दृष्टीनेही विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एक अग्रणी विद्यापीठ असून येथली ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्युरिटी अँड डाटा सायन्सेसचे राष्ट्रीय संस्थेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने सर्वसमावेशक स्वरूपाचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी कुलगुरू डॉ. शिंदेंना केली.
कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी इस्त्रो आणि आय.आय.टी. (मुंबई) यांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठाचा स्वत:चा खाजगी सॅटेलाईट विकसित करण्याचा मानस असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी सांगितले. त्यावर, हा चांगला उपक्रम असून त्यासंदर्भात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. तसेच, शिवाजी विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच महाविद्यालये निवडून त्याठिकाणी सॅटेलाईट अगर नेटवर्कच्या माध्यमातून टीचर्स ट्रेनिंगचा पायलट प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने तयारी करावी, अशी सूचना त्यांनी केली.