शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या… सात बारा कोरा करा !

मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकराने शेतक-यांसाठी घोषित केलेली कर्जमाफीची योजना फसवी आहे,शेतक-यांच्या या फसव्या कर्जमाफी मुळे आजही राज्यात कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या सुरु आहेत,त्यामुळे सरकारने शेतक-यांसाठी सरसकट कर्जमाफी करावी व शेतक-यांच्या सात बारा कोरा करावा तसेच मच्छिमारांसाठी तातडीने मत्स्यदुष्काळ जाहिर करावा अशी आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

विधानपरिषदेमध्ये मांडण्यात आलेल्या नियम २६० च्या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकराच्या फसव्या कर्जमाफी वर जोरदार टिकेची झोड उठविली. सरकार सवंदेनहीन झाले असून त्यांना शेतक-यांचे सोयरसुतक झालेले नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याच्या दरम्यान विद्यमान मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन शेतक-यांना सरसकट कर्जमाफीची आश्वासन दिले होते. पण आता सरकार येऊन सुध्दा महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने फुसण्याचे काम केले.सरकारची कर्जमाफी फसवी आहे. शेतक-यांची कर्जमाफी करताना शेतक-यांना दिर्घ-मध्यम मुदतीचे कर्ज माफीचे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाचे काय झाले असा रोखठोक सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

पाथर्डी जिल्हयात काल एका शेतक-याने आत्महत्या केली. त्या दुदुवी शेतक-यांच्या कुटुबियांची आपण काल तेथे जाऊन भेट दिली. त्या शेतक-यांच्या डोक्यावर ट्रक-टॅक्टरचे कर्ज होते. तसेच सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीच्या दोन्ही यादीमध्ये त्या शेतक-यांचे नाव आले नाही. त्यामुळे अखेर त्या शेतक-याला जीव गमवावा लागला. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, सरकारच्या फसव्या कर्जमाफीमुळे या बळीराजाला आपला जीव गमवावा लागला. तरीही या संवदेनहीन सरकारमधील एकही मंत्री शेतक-यांच्या कुटुंबियांच्या घरी गेले नाही. सरकार दोन लाख रुपये कर्ज माफी देत असतानाही शेतकरी आत्महत्या करत आहेत ही बाब अस्वस्थ करणारी आहे असेही दरेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजने अंतर्गत २ लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्याचे वचन महा विकास आघाडीने केले. या कर्जमाफीचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे होता परंतु राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या आहेत का असा प्रश्‍न दरेकर यांनी विचारला .शेतकऱ्याला शेती करत असताना ट्रॅक्टर, अवजार, फवारणी आदी साधनांसाठीचे कर्ज घ्यावे लागते. त्यांना मुलाबाळांचे शिक्षण पालन-पोषण करावे लागते.यामुळे सरकारने दिलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीचा शेतकऱ्याला काही फायदा होत नाही. म्हणून शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे कर्ज आणि दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी दरेकर यांनी केली.

शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी योग्य उत्पादन भाव व शेतीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगत दरेकर म्हणाले,राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊनही शेतकरी आत्महत्या करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दीड लाख कर्ज माफी देण्यात आली. इंसेंटिव्ह देण्यात आले. मात्र आता दीड लाख आणि दोन लाख असे कर्जाचे विभाजन करून कर्ज दिले जाते. दोन लाख कर्जमाफी देऊनही शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना सरकारने दिलेले आश्वासन हे खोटे असून ही कर्जमाफी फसवी असल्याची टीका दरेकर यांनी केली.

आपल्या राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. मासेमारी ही सुध्दा मत्स्यशेती आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. पावसाळ्याच्या काळात तीन- तीन महिने मासेमारी व्यवसाय ठप्प असतो. त्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्यांची अवस्था बिकट होते. मत्स्य शेती करणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा काळ मत्स्य दुष्काळ घोषित करावा. या कालावधीत उदर निर्वाहाचे साधन म्हणून सरकाने लघु उद्योग सुरू करून द्यावेत. मच्छीमारांचे कर्ज माफ करावे. तसेच कोळी बांधवाना डिझेल परतावा जो चार वर्षांनी मिळतो हा डिझेल परतावा कालबद्ध पद्धतीने लवकर मिळावा अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

Previous articleकर्जमाफीवरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
Next articleतिरंगा वाचवणाऱ्या कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार