आता औरंगाबाद विमानतळ नव्हे ; छत्रपती संभाजी महाराज विमानतळ म्हणा !

मुंबई नगरी टीम
मुंबई : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याची शिवसेना भाजपाची मागणी जोर धरत असतानाच राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज याची घोषणा विधानसभेत केली.

औरंगाबद महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असतानाच आज औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज याची घोषणा विधानसभेत केली.विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “ धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ” असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Previous articleउपसभापतींनी कामकाज गुंडाळले : दरेकर यांचा आरोप
Next articleविकास करताना कोकणचे समृद्ध वैभव जोपासणार : उद्धव ठाकरे