आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह टक्केवारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह  टक्केवारी नमूद असणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, राज्यातील विविध विद्यापीठांमार्फत गुण देताना विभिन्न पद्धतींचा अवलंब केला जातो. यामुळे इतर ठिकाणी प्रवेश घेताना आणि नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावेळी महाविद्यालयाला आणि नियुक्ती प्राधिकरणाला विद्यार्थ्यांच्या टक्केवारीची आवश्यकता असते. अकृषी विद्यापीठांद्वारे देण्यात येणाऱ्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुण देण्याच्या पद्धतीमध्ये एकसारखापणा असावा यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून श्रेयांक पद्धतीसह गुणपत्रिकेवर टक्केवारी नमूद करण्यात यावी.

तसेच शेवटच्या वर्षातील दोन सत्राचे गुण किंवा द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व सत्रांचे गुण मिळून पदवी न देता पदवीचा संपूर्ण कालावधी धरून सर्व सत्रांचे गुण विचारात घेऊन पदवी देण्यात यावी, असेही सामंत यावेळी म्हणाले.

Previous articleयेत्या शनिवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपत घेणार ?
Next articleशिवसेनेने प्रियंका चतुर्वेदींना उमेदवारी दिल्याने चंद्रकांत खैरे नाराज ?