मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने औरंगाबादचे माजी उपमहापौर डॅा. भागवत कराड भाजपचे तिसरे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे तर; शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेसने राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.आज भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि साता-याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.मात्र चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याने चौथ्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात आहे.
शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्याने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.प्रियंका चतुर्वेदी यांचे काम दिसले मात्र आमचे काम दिसले नाही अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.मात्र मी स्मशानात जाईपर्यंत मी शिवसेनेतच राहणार असेही ते म्हणाले. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केले आहे.आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत काम करतो आहे. प्रियंका चतुर्वेदी या हिंदी आणि इंग्रजीही बोलतात. मी गेली २० वर्षे लोकसभा गाजवली. मला नव्हे तर शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मला अनेकांनी पक्षात येण्याची ऑफर दिल्या पण त्या मी नाकारल्या असेही खैरे यांनी म्हटले आहे .
येत्या २६ मार्चला रोजी राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज भाजपाचे उमेदवार साता-याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर भाजपाने तिस-या जागेसाठी औरंगाबादचे माजी उपमहापौर डॅा. भागवत कराड यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.शिवसेनेने प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी तर काँग्रेसकडून राजीव सातव यांना राज्यसभेसाठी संधी दिली आहे.काँग्रेसकडून एका जागेसाठी मुकूल वासनिक,रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे यांची नावे चर्चेत होती.शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे इच्छूक होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र विकास आघाडीच्या चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याने चौथ्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नसले तरी चौथी जागा मिळावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.
भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री पंकजा मुंडे,गिरीश महाजन,आशिष शेलार आदी उपस्थित होते.शिवसेनेच्या वतीने राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत प्रियंका चतुर्वेदी यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता.त्यांनी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा प्रचार केला होता; परंतु अद्याप शिवसेनेकडून त्यांना मोठे दायित्व मिळाले नव्हते.आता शिवसेनेने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.