विधिमंडळाचे कामकाज शनिवारी गुंडाळणार

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात करोनाचे ११ रुग्ण आढळल्याने राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही गुंडाळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंतच घेण्याचा प्रस्ताव आज गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे विधिमंडळाचे कामकाज शनिवारपर्यंतच चालणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन विधिमंडळाचे कामकाज शनिवारपर्यंत करण्यात येणार असून तसा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला,त्याला सदस्यांनी मंजुरी दिली आहे. करोनाला घाबरून हा निर्णय घेण्यात आला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात असावेत, तसेच अधिकारी वर्गही आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी असावा, जेणे करून करोनाची परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करणे सोपे जाईल. तसेच करोना रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास अधिकाऱ्यांना वेळ मिळेल, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून विधिमंडळ परिसरात सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. आमदार आणि मंत्र्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्यात येत होता. अनेक आमदार विधानसभेत तोंडाला मास्क लावून येताना दिसले. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तोंडाला मास्क लावलेला होता. मी भीतीमुळे नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क लावले आहे. करोना व्हायरसमुळे विधानसभेचे कामकाज किती दिवस घ्यायचे हा निर्णय संसदीय कामकाज सल्लागार समिती घेईल ,पण मी जनजागृती आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क लावला आहे, असे सागर यांनी सांगितले.करोनामुळे राज्यातील अनेक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.शनिवारी नागपुरात ओबीसी महासंघाचा कार्यक्रम होणार होता. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हो कार्यक्रम होणार होता. मात्र, हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Previous articleकोरोना खबरदारी : यात्रा,सामूदायिक,शासकीय कार्यक्रम रद्द
Next articleआता विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन साक्षांकित करुन मिळणार