आज मध्यरात्रीपासून महानगरातील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने,कार्यालये बंद

मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र रेल्वे, बस या सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही.पुढील १५ ते २० दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याने त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील मुंबई, पुणे- पिंपरी चिंचवड,नागपूर येथील सर्व दुकाने,आस्थापना व खासगी कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य, औषधी, दूध, इत्यादी दुकाने सुरु राहू शकतील.आज मध्यरात्रीपासून हे आदेश अंमलात येतील. शासकीय कार्यालयांतील उपस्थिती ५० टक्क्यावरून २५ टक्क्यांवर आणण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्शभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यामातुन जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रेल्वे आणि बस वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.बसेस,रेल्वे बंद करा असे अनेक सल्ले अनेकांनी दिले मात्र अत्यावश्यक सेवेत काम करणारे मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार हे प्रश्न उपस्थित होत असल्याने तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत २५ टक्के कर्मचारीच कामावर बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच ५० टक्के कर्मचारी उपस्थिती राहील असा निर्णय सरकारने घेतला होता.बंदच्या बाबत कुणाही नागरिकांना काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी,आयुक्त यांच्या संपर्कात राहावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,ज्या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येत आहेत त्यांनी त्याच्याकडे असणारे कष्टकरी, कामगार कर्मचारी वर्ग यांना किमान वेतन देणे बंद करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कारण या कामगारांचे हातावर पोट आहे.जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे असही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे.दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वचजण या कामी पुढे आले आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.असे निर्णय आपल्या काळजीसाठी घेत आहोत.आपले सहकार्य असू द्या असेही आवाहन त्यांनी केले.या आर्थिक वर्षाचे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे.याशिवाय २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती केली. फेब्रुवारी २०२०ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Previous articleसरकारने हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करावी : चंद्रकांत पाटील
Next articleपहिली ते आठवींपर्यंतच्या परीक्षा रद्द : वर्षभराचे मुल्यमापन बघून निकाल