राज्यावरील संकटाचा संधी म्हणून उपयोग करू नये: मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जारी करण्यात आली आहे.महाराष्ट्रावर आलेल्या या संकटाचा कोणी संधी म्हणून उपयोग करु नये. या परिस्थितीत कोणीही काळाबाजार करु नये, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांनी आज लाईव्हच्या माध्यामातुन  राज्यातील जनतेशी संवाद साधला.

सध्याच्या काळात राज्यातील जनता  करीत असलेल्या सहकार्यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले. आहेत. आज रात्रीपासून देशांतर्गत विमान सेवा बंद होत आहे.गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कर व जीएसटी  परतावा तारीख वाढवून देण्याची विनंती केली होती ती त्यांनी मान्य केली आहे त्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. संचारबंदी असतानाही अजूनही लोक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधी, दुध ,भाजीपाला घेण्यासाठी जनतेला बाहेर यावे लागणार असले तरी आपल्याला आता गांभीर्य ठेवावे लागणार आहे. मी याबाबत पोलिसाना देखील सुचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी या वस्तूंसाठी नागरिक बाहेर पडत असतील तर पोलिसांनी देखील त्याची योग्य खातरजमा करून घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंची, शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, आणि संबंधित कामगार  ने आण करणारी वाहने अडवू नका अशा सुचना मी दिल्या आहेत. मात्र अशा अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या संस्था, कंपन्यांनी आपल्या वाहनांवर कंपन्यांचे नाव ठळकपणे लावावे तसेच कोणत्या आवश्यक वस्तूची वाहतूक करीत आहोत ते त्यात स्पष्ट लिहावे. वाहनांतील त्यातील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असावीत. अत्यावश्यक सेवेतील किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी अडचण येत असेल तर त्यांनी पोलिसांच्या मदत कक्षाशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले. पोलिसांनी काही लाख मास्क धाड टाकून पकडले त्यासाठी त्यांनी पोलीसांचे अभिनंदन केले, या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणीही साठेबजीची संधी घेऊ नये असेही ते म्हणाले.

राज्यात जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचा साठा  पुरेसा  आहे. यासंदर्भात आजच अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानाही सुचना दिल्या आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. या परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, मंदिरे मदतीसाठी पुढे आले आहेत. लालबागच्या राजाने रक्तदान शिबिरे सुरु केले आहे तर शिर्डी, सिद्धीविनायक यांनी देखील आपापल्या परीने मदतीची तयारी दाखविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या संस्थाना कुठेही अडचण येऊ नये  म्हणून सुचना देण्यात आल्या असून, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडथळा येऊ नये अशा सुचना पोलिसांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Previous articleशेतकऱ्यांचा माल बाजारात येणार,त्यांचं नुकसान होणार नाही
Next articleजीवनावश्यक वस्तू,अन्न धान्य,औषधी,दुध,भाजीपाल्याचा पुरवठा सुरू राहणार