मत्स्य व्यावसायिकांना दिलासा; आता मासे वाहतूक करता येणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे, कोळंबी, मत्स्यबीज व मत्स्यखाद्य यांचा समावेश अत्यावश्यक बाबींमध्ये करण्याच्या सूचना राज्यांना पत्राद्वारे केलेल्या असून केंद्राकडून आलेल्या पत्राची त्वरीत दखल घेत राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने मासे,मत्स्यबीज व मत्स्यखाद्य यांचा समावेश अत्यावश्यक बाबींमध्ये करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना  दिल्या असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. या निर्णयामुळे संचारबंदी काळातही मासे, मत्स्यबीज व मत्स्यखाद्य यांची वाहतूक करता येणार आहे.

संचारबंदी काळात आंतरराज्य व राज्यांतर्गत वाहतूकीवर निर्बंध लादण्यात आल्याने कोकणासह, वसई,उत्तन, मढ, वर्सोवा,सातपाटी भाऊचा धक्का,ससुन डॉक येथील बंदरांवर  शेकडो टन मासळी गेले कित्येक दिवस मासेमारी नौकांमध्येच पडून आहे. केंद्र सरकारने माशांचा अत्यावश्यक बाबीमध्ये समावेश केल्याने गुजरात, कर्नाटक तसेच राज्यातील  परदेशात मासळी निर्यात करणाऱ्या कंपन्या  थेट बंदरांवरुन मासळी उचलू शकणार आहेत. शिवाय स्थानिक बाजारपेठांमध्येही हा मासा पोहचू शकेल. राज्यसरकारच्या या निर्णयामुळे मत्स्यशेती करणाऱ्या,समुद्री मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना तसेच मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.सरकार मच्छीमारांच्या बाजूने ठामपणे उभे आहे. सरकारने मत्स्यवाहतूकीला परवानगी दिली असली तरी लोकांनी मासे खरेदीविक्रीच्या वेळी गर्दी करु नये व सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन शेख यांनी केले आहे.

Previous articleलॅटव्हियात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले मंत्री उदय सामंत
Next articleकर्जवसुली स्थगितीसाठी सल्ला नको तर निर्देश द्या: अजित पवार