मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या २४ एप्रिल रोजी विधानपरिषदेच्या ९ सदस्यांची मुदत संपत असून, विधानसभा सदस्याद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणारी निवडणुक सध्या देशात आणि राज्यात असलेल्या कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रिय निवडणुक आयोगाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढत चालला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात २१ दिवसांसाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.या कोरोना विषाणूंचा फटका राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकांना बसला आहे.महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण ९ सदस्यांची मुदत येत्या २४ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे या ९ जागांसाठी निवडणुक प्रकिया सुरू होणार होती. मात्र देशात आणि राज्यात असलेल्या टाळेबंदीच्या आणि कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुक प्रकियेवेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांना याचा प्रदुर्भाव होवू नये म्हणून विधानपरिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीची प्रकिया अनिश्चित कालावधीकरीता पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रिय निवडणुक आयोगाने त्यासंदर्भातील आदेश जारी केले असल्याने राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुका लांबवणीवर पडल्या आहेत.
विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले, आनंद ठाकूर,किरण पावसकर,कॅांग्रेसचे हरिसिंग राठोड, चंद्शिवसनेच्या नीलम गो-हे, भाजपचे अरूण अडसड,पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ आणि चंद्रकांत रघुवंशी या सदस्यांची मुदत येत्या २४ एप्रिल रोजी संपत आहे.अशा निवडणुकांमध्ये निवडणुक अधिकारी,राजकीय पक्षांचे नेते, सहाय्यक अधिकारी, विधानसभा सदस्य,प्रत्यक्ष सहभाग येत असल्याने त्याच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भिती असते.सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक सुरक्षा आणि आरोग्याचा धोका टाळण्यासाठी या निवडणुका नियोजित वेळेत पार पाडल्या जावू शकत नसल्याचे केंद्रिय निवडणुक आयोगाने आदेशात म्हटले आहे.त्यानुसार रिक्त होणा-या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणारी निवडणुक पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला आहे.देशातील आणि राज्यातील सध्या असणारी परिस्थिती निवळताच या निवडणुकीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.