शिंदे गटाला ‘ ढाल तलवार’ चिन्ह ; आता मशाल विरूद्ध ढाल तलवार सामना रंगणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मशाल चिन्ह दिले असतानाच आज केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेला ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे.त्यामुळे येत्या काळातील निवडणुकांमध्ये मशाल विरूद्ध ढाल तलवार असा सामना रंगणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर कालच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्याचा निर्णय दिला आहे.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाला मशाल चिन्ह दिले आहे.त्रिशूळ,उगवता सुर्य हे चिन्ह धार्मिक असल्याने ते देण्यास नकार देत शिंदे गटाला चिन्हाचे तीन पर्याय देण्यास सांगितले होते.त्यानुसार शिंदे गटाने आज पहिल्यांदा शंख,तुतारी आणि रिक्षा तर दुस-यांदा ढाल तलवार,सुर्य आणि पिंपळाचे झाड हे पर्याय सुचवले होते.त्यामुळे निवडणूक आयोगाने आज शिंदे गटाला ( बाळासाहेबांची शिवसेना ) ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे.आज शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह दिल्याने आगामी निवडणुकांमध्ये ढाल तलवार विरूद्ध मशाल अशी लढत रंगणार आहे

Previous articleहिंदुत्वापासून दूर गेल्याने उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची प्रतीके असलेली चिन्हे मागण्याचा अधिकार नाही
Next articleपंजाच्या पकडीतील ‘मशाल’ महाराष्ट्र स्वीकारणार नाही : बावनकुळे यांची खरमरीत टीका