मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.या कालावधीत अवैध दारू विक्री व वाहतूक करणा-यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कार्यवाही केली आहे .काल पर्यंत राज्यातील विविध भागात केलेल्या कारवाईत एकूण १ हजार २२१ गुन्हे नोंदविण्यात येवून २ कोटी ८२ लाख ३१ हजार १०२ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत मद्य वाहतूक करणारी ३६ वाहने जप्त केली असून अवैद्य दारू विक्री करणा-या एकूण ४७२ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी विभाग 24 तास कार्यरत आहे.त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यातून अवैध दारू येणार नाही याकरिता १२ कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत. तसेच १८ तात्पुरते सीमा तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत.अशी व्यवस्था करण्यात येवूनही राज्यात सध्याच्या काळात अवैद्य दारू विक्रीच्या घटना सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.यामध्ये २ कोटी ८२ लाख ३१ हजार १०२ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून, अवैद्य दारू विक्री करणा-या एकूण ४७२ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
टाळेबंदीच्या काळात अवैध मद्य निर्मिती वाहतूक विक्री करणा-या विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक ८४२२००११३३.ई-मेल commstateexcise@gmail.com असा आहे. करिता सदर नमूद क्रमांकावर अवैध मध्ये विरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

















