ठाकरे सरकारचा दिलासा;बांधकाम कामगारांच्या खात्यात दोन हजार रूपये जमा होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोना  विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झालेली आहेत.बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही.त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अशा कामगारांना राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे.मंडळाकडील नोंदणी असलेल्या सक्रीय बांधकाम कामगारांच्या थेट खात्यात दोन हजार रूपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील  लॉकडाऊन येत्या ३ मे पर्यंत घोषित करण्यात आला आहे. राज्यातील विविध भागात अडकलेल्या ऊसतोड कामगारांना परत आपल्या घरी पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर अशा अडचणीच्या परिस्थितीत राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा दिला आहे.लॉकडाऊमुळे राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झालेली आहेत. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही.त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,कामगार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत अशा कामगारांना दिलासा देण्यासाठी कामगार मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना दोन हजार रूपये आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येतो.मंडळाकडे जमा उपकर निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. करोना विषाणूच्या  प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत नोंदणी करण्यात आलेल्या राज्यातील एकूण १२ लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रूपये प्रमाणे आर्थिक मदत करण्यात येणार आहे.सदरचे आर्थिक सहाय्य नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. अशी माहिती  कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी  दिली.

Previous articleखूशखबर : तीन महिने घरभाडे वसुली न करण्याच्या सूचना
Next articleसरकारकडून धान्य वाटपाची गोलमाल आकडेवारी