जवानांप्रमाणे कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता तेवढीच महत्वाची

मुंबई नगरी टीम

नाशिक : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणे रुग्णांच्या जीवासाठी कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता तेवढीच महत्वाची आहे.त्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने देणगी नव्हे तर डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

 भुजबळ यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेत खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने कृतज्ञता म्हणून वाटप करण्यात येत असलेल्या फेस शिल्ड मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ.अमोल वाजे, डॉ.योगेश गोसावी, डॉ.विष्णू अत्रे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.समीर चंद्रात्रे, सचिव डॉ.सुदर्शन आहिरे, उपाध्यक्ष डॉ.प्राजक्ता लेले, खजिनदार डॉ.प्रशांत सोनावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या बचावासाठी खाजगी रुग्णालये सुरु ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असतांना डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने फेस शिल्ड मास्क तयार करण्यात आले आहे. खाजगी डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफला राष्ट्रवादी डॉक्टर सेल व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या समन्वयातून साहित्य वाटप करण्यात येत आहे.  राज्यभरातील दीड लाख डॉक्टरांना फेस शिल्ड मास्कचे वाटप करण्यात येत असून याची सुरवात आज नाशिक येथून करण्यात आली आहे.

Previous articleसत्ता नसल्याने काही लोक अस्वस्थ; जयंत पाटलांचा भाजपाला टोला
Next articleप्रवीण दरेकरांनी केले आदिवासी पाड्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप