व्यापारी संघटनेचे आवाहन : राज्य सरकारचे आदेश येईपर्यंत दुकाने उघडू नका

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने काही अटींसह  दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.मात्र महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत कुणीही दुकाने उघडू नका  असे आवाहन फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोशिएशनचे अध्यक्ष वीरेश शाह यांनी  राज्यातील आणि मुंबईतील दुकानदारांना केले आहे.

मद्याची दुकाने आणि मॉल्स वगळता काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने हा  निर्णय घेतला असला तरी जोपर्यंत महाराष्ट्र सरकार किंवा मुंबई  महानगरपालिका याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत कोणत्याही व्यापा-यांनी आपली दुकाने उघडू नये अस आवाहन फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोशिएशनचे अध्यक्ष वीरेश शाह यांनी केले आहे. शहा यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले असले तरी याबाबत कोणीही अफवा पसरवू नका असेही आवाहन केले आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने  जारी केलेल्या आदेशात सवलत दिली असली तरी काही अटी देखील घातल्या आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.कोरोना बाधित क्षेत्रात आणि हॉटस्पॉट असेलेल्या भागात दुकाने उघडता येणार नाहीत. त्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील दुकानदारांनी राज्य सरकारच्या निर्देशांची वाट पाहवी असेही आवाहन शहा यांनी केले आहे.

Previous articleदुकानदारांना दिलासा : आजपासून  दुकाने उघडण्याची परवानगी
Next articleबार,दारूची दुकाने,सलून बंदच राहणार