मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले आहे.यावर उपाय योजना करण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार चांगले काम करीत असतानाही यावरून राज्यातील विरोधी पक्ष राजकारण करीत असल्याबद्दल मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारच्या नेत्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता भाजपवर हल्लाबोल केला आहे. ज्यांना टिका करायची असेल त्यांना करु द्या, त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल अशी मिश्किल टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुकवरुन संवाद साधला. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भात राज्यपालांना पुन्हा एकदा विनंती करण्यात आली आहे.यावरही त्यांनी भाष्य केले.कुठल्याही राजकीय विषयाबद्दल कुठलीही आता अस्थिरता आणणे हे अशा काळात योग्य नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई आपण कॉमन अजेंडा करुन लढली पाहिजे असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.राज्य सरकार एकीकडे कोरोना सारख्या संकटाचा मुकाबला करीत असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते सरकारवर टीका करतानाचे चित्र आहे. यावरूनही त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.ज्यांना टिका करायची असेल त्यांना करु द्या त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल अशी मिश्किल टिका नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर त्यांनी केली.
आपला फोकस कामावर असला पाहिजे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे आपला फोकस कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी असायला हवा. लॉकडाऊन हळूहळू कमी झाले पाहिजे असे वैयक्तिक मत मांडतानाच हे अनलॉकिंग कॅफे किंवा कॉफी डे मध्ये जाण्यासाठी नाही तर काम करुन आपण नियम व कायदे पाळू. देशाला आज कामाची गरज आहे. काम व कष्ट करून आपले राज्य व देश उभा करण्याची वेळ आहे. नुसते घाबरून घरात बसून आपले प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जी दिशा देतील.सरकार जे नियम व कायदे बनवेल त्याचे पालन करावे. हे नियम व कायदे सरकारसाठी नाही तर आपल्यासाठी आहेत हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो निर्णय मिलिटरीच्या शिस्तीप्रमाणे पालन करा असे आवाहनही सुळे यांनी केले.आज राज्य व देश बांधण्याची, कष्ट करण्याची,एकमेकांचे हात धरण्याची आणि विचारांची लढाई लढण्याची व कष्ट करण्याची वेळ आहे. राजकारण करण्याची वेळ नाही. माझ्या पक्षाचे लोक चांगले काम करत आहेत त्यांचे कौतुक करणारे पोस्टिंग करण्याचे सरकारने नियम केल्यावर बंद केले. आज ४० दिवस झाले मी घराबाहेर पडलेली नाही. मी सरकारचे नियम तंतोतंत पाळत असल्याचेही सुळे यांनी सांगितले.
जितक्या लवकर नियम पाळू तितक्या लवकर लॉकडाऊन उठेल तेवढ्या लवकर आर्थिक अडचणीवर मात करु शकतो. आपले राज्य पायावर उभे कसे राहिल. आज आपल्यासमोर काम करुन आपली आर्थिक स्थिती जाग्यावर आणण्यासाठी काम केले पाहिजे. आरोग्य व आर्थिक स्थिती यांच्यातील सुवर्णमध्य साधूनच आपल्याला पुढे जावे लागेल असे सांगतानाच आज अन्न वाटतोय पण आता त्यांना अन्न नकोय तर हाताला काम हवं आहे. शिजवून दिलेले अन्न नकोय तर रेशन हवं आहे. दहा दिवसाचं रेशन दिलं तर ती लोकं दहा दिवस घराबाहेर पडणार नाहीत. शिवाय प्रशासनावरील ताणही कमी होईल त्यामुळे शक्यतो रेशन कीट देणंच महत्वाचं आहे असा सल्लाही सुळे यांनी दिला आहे. महाराष्ट्रात कुठेही थुंकणे थांबवण्यासाठी एक मोहीम राबविण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले आहे. शिवाय टीबी आजारामुळे वर्षाला १५ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी सांगितली.या आजारावर उपचार आहेत तरी इतके लोक प्राण गमावत आहेत. तर दुसरीकडे कोरोनावर अजून लस आलेली नाही. एकंदरीत आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत का असा सवालही त्यांनी केला.