मुंबई नगरी टीम
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसने दिलेल्या दुस-या उमेदवारामुळे निर्माण झालेला राजकीय तिढा अखेर सुटला आहे.काँग्रेसने या निवडणुकीसाठी एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.काँग्रेसच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेवर जाण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
विधान परिषदेच्या २१ मे रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांना उमेदवारी दिली आहे.भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील,गोपीचंद पडळकर,डॉ. अजित गोपछेडे आणि प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने आज शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेस पक्षाने राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी या दोघांना उमेदवारी दिल्याने ९ जागांसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने निवडणूक बिनविरोध होणार नसल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले आहे.त्यानुसार आता राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी या पैकी एकच उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,परिवहनमंत्री अनिल परब,खा.संजय राऊत,मिलिंद नार्वेकर,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,सार्वजनिक बांधकांममंत्री अशोक चव्हाण, तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
काँग्रेसने पक्षाने एकाच उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री ठाकरे हे निवडणूक लढवित आहेत. तर दुसरीकडे राज्यात असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीत आमदारांना मतदानासाठी मुंबईत आणणे योग्य होणार नसल्याने काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.काँग्रेसच्या या निर्णयामुळे सर्वच पक्षांना दिलासा मिळाला आहे.काँग्रेसच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेवर जाण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.