मी एकच ठरवून आलेय…राजकारण न करता काम करेन : आसावरी जोशी

मुंबई नगरी टीम

मुंबई । मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राजकारणात आले तरी राजकारण न करता काम करेन,कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करेन.माझ्यावर जो विश्वास टाकण्यात आला आहे, तो मी नक्की पूर्ण करेन असे यावेळी आसावरी जोशी म्हणाल्या.

अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र पुढे नेण्याचे काम शरद पवार करत आहेत असेही अजित पवार म्हणाले. प्रवेश द्यायचा आणि संपर्क ठेवायचा नाही असं होता कामा नये. शिवाय पक्षाला बाधा निर्माण होईल असे काम करु नये अशी सूचना पवार यांनी व्यक्त केली.कोरोनाच्या संकटातून पूर्वपदावर महाराष्ट्राला आणले आहे. तरीही लोकांनी मास्क लावून काळजी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या संकटात आपण खूप भोगलं आहे आता कुठे सावरण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करत आहे अशावेळी काही राजकीय पक्ष कोणताही विषय काढून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे असेही पवार म्हणाले. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप इतके दिवस चालवण्याची गरज नव्हती. पगार वेळेवर होईल असा शब्द कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला काही कर्मचारी बळी पडत असून राज्याच्या हिताच्यादृष्टीने महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत असेही पवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील तीन हजार कलाकारांना आपण राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदत दिली आहे. शिवाय तमाशा कलावंतांनाही मदत दिली असल्याचे अजित यांनी सांगितले.

कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करेन तसेच माझ्यावर जो विश्वास टाकण्यात आला आहे, तो मी नक्की पूर्ण करेन. मी एकच ठरवून आले आहे की, राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन असे अभिनेत्री आसावरी जोशी यांनी म्हणाल्या.

Previous articleप्रविण दरेकरांची भाई जगतापांना कायदेशीर नोटीस; माफी न मागितल्यास १०० कोटींचा दावा
Next articleअजितदादांनी सांगितले…पवारसाहेबांनी पंतप्रधानांशी सर्व विषयांवर चर्चा केलीय